बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील जय किसान खासगी बाजारपेठ आणि एपीएमसी व्यापाऱ्यांमधील तीव्र संघर्ष जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी मध्यस्थी करून तूर्तास निर्णायकपणे मिटवला असून सरकारी एपीएमसीच्या आवारातच सर्व व्यापार व व्यवहार चालवण्याचे निर्देश जारकीहोळी यांनी दिले, ज्याला खासगी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे सरकारी एपीएमसीला बळकटी मिळणार असून, व्यापारासाठी रिक्त गाळ्यांचे तात्काळ वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तीव्र संघर्षाचे कारण ठरलेल्या जय किसान खासगी बाजारपेठ आणि एपीएमसी व्यापाऱ्यांची मंगळवारी बेळगाव येथील एपीएमसी बाजारपेठेत बैठक झाली. या बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी एपीएमसीच्या आवारातच व्यापार व व्यवहार चालवण्याचे निर्देश दिले.
खाजगी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी एपीएमसीमध्ये व्यापार करण्यासाठी तयारी दर्शवली. एपीएमसीच्या आवारात असलेल्या रिक्त गाळ्यांमध्ये आम्हाला व्यापार व व्यवहार सुरू करण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी; आम्ही एपीएमसीत येण्यास तयार आहोत, असे त्यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमोर मान्य केले.

सरकारी एपीएमसीला बळकटी देण्यासाठी सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जारकीहोळी यांनी केले. तसेच, खाजगी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसाठी त्वरित गाळे वाटप करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना दिले.
यावेळी आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, खासगी बाजारपेठेतील व्यापारी आणि एपीएमसी व्यापारी उपस्थित होते.




