बेळगाव लाईव्ह : बेळगाव एपीएमसी होलसेल भाजी मार्केटमधील दुकानांच्या एकुण गाळ्यांपैकी 100 गाळ्यांमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्री व्यवहार सुरू केले असून अद्याप 150 गाळे रिक्त आहेत. हे गाळे तूर्तास इच्छुक व्यापाऱ्यांना मागणीनुसार ठराविक भाड्याने दिले जातील. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने लवकरच या गाळ्यांचे लिलावाच्या माध्यमातून रीतसर वितरण केले जाईल, अशी माहिती बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) सचिव विश्वास रेड्डी यांनी दिली.
बेळगाव एपीएमसी होलसेल भाजी मार्केट येथे आज गुरुवारी सकाळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. एपीएमसी सचिव रेड्डी यांनी सांगितले की, आमचे हे भाजी मार्केट कालपासून अतिशय उस्फुर्त प्रतिसादात उत्तमरित्या सुरू झाले असून आज देखील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या एकमेकातील सहकार्यामुळे या ठिकाणी विक्रीमध्ये उत्तम दर मिळत असल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.
आमचे हे भाजी मार्केट विशाल अशा जागेमध्ये वसले असून येथे मार्केटच्या इमारतीची अतिउत्तम व्यवस्था आहे. एपीएमसी भाजी मार्केटमधील दुकानांच्या एकुण गाळ्यांपैकी 100 गाळ्यांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले असून अद्याप 150 गाळे रिक्त आहेत. हे गाळे तूर्तास इच्छुक व्यापाऱ्यांना मागणीनुसार ठराविक भाड्याने दिले जातील.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पुढील दिवसांमध्ये या गाळ्यांचे रीतसर लिलावाच्या माध्यमातून वितरण केले जाईल. भाजी मार्केट परिसरातील प्रशस्त रस्त्यांमुळे मालवाहतूक सुरळीत सुरू आहे.
मालवाहू तसेच इतर वाहनांची कोंडी होणार नाही या पद्धतीने वाहतुकीची व पार्किंगची सोय करण्यात आली असून यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे असे सांगून भाजी मार्केटचे कामकाज सुरळीत रहावे यासाठी आमचे कर्मचारी या ठिकाणी आपले कर्तव्य निरंतर बजावत राहतील. त्याचप्रमाणे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी या ठिकाणी आवश्यक सर्व त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह शेतकऱ्यांना विसावा घेण्यासाठी रयत भवन वगैरेंचा समावेश आहे, अशी माहिती विश्वास रेड्डी यांनी दिली.


