उत्तर कर्नाटकातील नेत्रोपचारासाठी दोन मोठ्या संस्थांचा ऐतिहासिक समन्वय
‘युनायटेड फॉर व्हिजन’ संकल्पनेखाली डॉ. जोशी आणि डॉ. कोडकणी नेत्र केंद्रे एकत्र
बेळगाव लाईव्ह : उत्तर कर्नाटकातील नेत्रोपचार क्षेत्रातील दोन अत्यंत प्रतिष्ठित नावे—डॉ. एम. एम. जोशी नेत्र संस्था, हुबळी आणि डॉ. कोडकणी नेत्र केंद्र, बेळगाव—यांनी “युनायटेड फॉर व्हिजन” या समन्वयकारी संकल्पनेखाली एकत्र येण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
या ऐतिहासिक भागीदारीमुळे अनेक दशकांचे उत्कृष्ट रुग्णसेवेचे अनुभव, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्रक्रिया कौशल्ये एकत्र येत आहेत. यातून या प्रदेशातील सर्वसमावेशक नेत्र आरोग्य सेवांसाठी एक मजबूत आणि एकात्मिक व्यासपीठ तयार होणार आहे.
हे विलीनीकरण बेळगाव येथील डॉ. कोडकणी नेत्र केंद्रात ३० सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. यावेळी हुबळी येथील एम. एम. जोशी नेत्र संस्थेचे संचालक—डॉ. ए. एस. गुरुप्रसाद, डॉ. आर. कृष्णप्रसाद आणि डॉ. श्रीनिवास जोशी—तसेच डॉ. कोडकणी नेत्र केंद्र, बेळगाव येथील संचालक—डॉ. शिल्पा कोडकणी, कीर्ती नेर्लेकर आणि राजेंद्र बेळगावकर—यांनी माध्यमांशी संवाद साधत विलीनीकरणामागील त्यांची दृष्टी आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली.
विलीनीकरणाच्या प्रमुख बाबींमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी झायमर ८ रोबोटिक तंत्रज्ञान, तसेच चष्म्यापासून मुक्त दृष्टीसाठी स्माईल (CLEAR) तंत्रज्ञान सर्व वयोगटांसाठी उपलब्ध होईल. याशिवाय, प्रगत रेटिना लेझर आणि शस्त्रक्रिया प्रक्रिया, कॉर्नियल प्रत्यारोपण, तिरळेपणा (Squint) आणि लहान मुलांमधील नेत्रविकारांसाठी बालरोग नेत्रचिकित्सा (Paediatric Ophthalmology) सेवांचा समावेश आहे.
या वेळी बोलताना दोन्ही सुविधांच्या संचालकांनी जोर दिला की, “हे विलीनीकरण केवळ दोन रुग्णालयांचे मिलन नाही, तर या प्रदेशातील आणि त्यापलीकडील नेत्रोपचाराचे मानके उंचावण्याची आमची प्रतिज्ञा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पद्मश्री डॉ. एम. एम. जोशी यांनी १९६७ मध्ये हुबळी येथे डॉ. एम. एम. जोशी नेत्र संस्था या संस्थेची स्थापना केली. ही संस्था प्रगत नेत्रोपचार आणि शिक्षणातील अग्रणी असून, कर्नाटकात अत्याधुनिक सुविधांसह हजारो रुग्णांना सेवा देत आहे. तर डॉ. कोडकणी नेत्र केंद्राची डॉ. शिल्पा कोडकणी यांनी २००० मध्ये बेळगाव येथे या स्थापना केली. मोतीबिंदू, कॉर्निया आणि रेटिना उपचारांमध्ये विशेष सेवा देत उत्कृष्ट क्लिनिकल नेत्ररोग सेवा आणि दयाळू रुग्णसेवेसाठी या केंद्राने नाव कमावले आहे.
विलीनीकरणाचा औपचारिक सोहळा रविवार, ऑक्टोबर ५, २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला डॉ. प्रभाकर बी. कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जगदीश शेट्टर (खासदार), सतीश जारकीहोळी (मंत्री, सार्वजनिक बांधकाम), लक्ष्मी हेब्बाळकर (मंत्री, महिला व बाल विकास), राजू सेठ (आमदार, बेळगाव उत्तर), भीमशंकर एस. गुळेद (पोलीस अधीक्षक, बेळगाव) आणि विशेष अतिथी म्हणून माधव गोगटे (व्यवस्थापकीय संचालक, गोगटे ग्रुप) तसेच अनिश मेट्राणी (व्यवस्थापकीय संचालक, स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. लि.) उपस्थित राहतील. ९१ वर्षीय पद्मश्री डॉ. एम. एम. जोशी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल.



