बेळगाव लाईव्ह : दुचाकी आणि स्कूल बस मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार तर एक युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे.खानापूर-नंदगड-बिडी मुख्य मार्गावर नंदगडजवळील व्हन्नवादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी दुचाकी आणि शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
सदर अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव मारुती उमेश कोडोळी (वय 19, रा. आवरोळी) असे आहे तर जखमी युवकाचे नाव विठ्ठल उर्फ शशीधर फकीर गांजी (वय 19, मुळगाव कामशीनकोप्प, सध्या रा. आवरोळी) असे आहे. अपघातानंतर मारुती कोडोळी याचा मृतदेह खानापूर येथील शासकीय दवाखान्यात आणण्यात आला. तर गंभीर जखमी विठ्ठल गांजी याला तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात आणि जखमी झालेले दोघे युवक आवरोळी गावातील रुद्र स्वामी मठावरील यात्रेला उपस्थित राहून काही कामानिमित्त खानापूर येथे आले होते. काम आटपल्यानंतर ते नंदगड-बिडी मार्गे परत आपल्या गावाकडे निघाले होते. व्हन्नवादेवी मंदिरापासून काही अंतरावर त्यांच्या दुचाकीची समोरासमोर शाळेच्या बसशी धडक झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दोघेही युवक दुचाकीवरून फेकले गेले व डोक्याला गंभीर दुखापत झाली यामध्ये मारुती कोडोळी याचा जागीच मृत्यू झाला. तर विठ्ठल गांजी हा गंभीर जखमी झाला विठ्ठल हा सध्या आपल्या मामाच्या घरी आवरोळी येथे वास्तव्यास होता, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. हा अपघात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला असावा अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
अपघाताची नोंद नंदगड पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास नंदगड पोलिस करत आहेत. उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. उत्तरीय तपासणीनंतर मारुती कोडोळी याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपविण्यात येणार आहे.
या दुर्घटनेमुळे आवरोळी व परिसरात शोककळा पसरली आहे.


