बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आज जयकिसान भाजी मार्केटच्या सर्व्हिस रोडवर भाजी घेऊन जाणारी एक मिनी व्हॅन रस्त्यातील पाण्याच्या भरलेल्या खड्ड्यात अडकून उलटली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र भाजी रस्त्यावर पसरल्यामुळे विक्रेत्या महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
भाजी मार्केटच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना रस्ता दिसत नाही. यामुळे लोकांना चालताना आणि प्रवास करताना अडचणी येत आहेत. याच कारणामुळे आज भाजी घेऊन जाणारी मिनी व्हॅन उलटली, ज्यामुळे सर्व भाजी रस्त्यावर पडली आणि मोठे नुकसान झाले.
या अपघातामुळे भाजी विक्रेत्या महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. “दररोज भाजी मार्केटला जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
आधीच महागाईमुळे त्रास आहे, त्यात असा अपघात होऊन मोठे नुकसान झाले,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम असून, संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी वाहन मालकाने केली आहे. नागरिकांनीही तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.


