बेळगाव लाईव्ह: शहराच्या विकासाला विशेष प्राधान्य देत असून, येथील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरकार गंभीर प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. बेळगावमध्ये २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या प्रायोगिक उद्घाटनावेळी ते बोलत होते. ही योजना शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील ४७ आणि ५५ क्रमांकाच्या वॉर्डांमध्ये या २४ तास पाणीपुरवठा योजनेचा प्रायोगिक शुभारंभ करण्यात आला. या वेळी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले, “आमदार फिरोज सेठ यांच्या काळात या योजनेसाठी प्रयत्न सुरू झाले होते आणि भाजप सरकारच्या काळात याला मंजुरी मिळाली. आम्ही सत्तेत आल्यापासून बेळगावच्या विकासावर अधिक भर देत आहोत.”
यावेळी खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, “पूर्वी दोन-तीन दिवसांनी पाणी येत होते, ज्यामुळे लोकांना पाणी साठवून ठेवावे लागत होते. आता २४ तास पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची नासाडी थांबेल.”
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी बेळगावला बंगळूरनंतर सर्वाधिक आमदार लाभले असून, वाढत्या शहराला मूलभूत सुविधा पुरवणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांना पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले.
आमदार आसिफ सेठ म्हणाले की, २०१५ मध्ये सतीश जारकीहोळी मंत्री असताना आणि फिरोज सेठ आमदार असताना, हिडकल धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना तयार केली होती. हिडकल धरणातून दररोज ६० कोटी लिटर शुद्ध पाणी बेळगावला येत आहे. तसेच, कणबर्गी येथील रस्ता रुंद करणे आणि तलावाची स्वच्छता व विकास करणे यांसारखी कामेही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह इतर मान्यवरांचा कणबर्गी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, नगरसेवक आणि एल अँड टी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.


