बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गाईंकडे त्यांच्या मालकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाने या गोमातांची काळजी घेऊन त्यांना गोशाळेमध्ये सोडावे. अन्यथा ते काम श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणला पार पाडावे लागेल, असे विनंती वजा इशाऱ्याचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणच्यावतीने आज पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगाव तालुका प्रमुख भरत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयामध्ये शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन उपरोक्त विनंतीचे निवेदन त्यांना सादर केले.
पोलीस आयुक्त बोरसे यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अलीकडे बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गाईंची संख्या वाढली आहे.

रस्त्यावर मोकाट फिरण्याबरोबरच कांही ठिकाणी त्या रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेल्या आढळून येतात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनावधानाने वाहनांच्या ठोकरींमुळे या गाईंना दुखापती होण्याच्या घटनाही घडतात.
सदर मोकाट गायींकडे त्यांच्या मालकांचे दुर्लक्ष होत असून ते आपली जबाबदारी झटकताना दिसतात. त्यामुळे तुम्ही या गोमातांची काळजी घेऊन त्यांना गोशाळेमध्ये सोडण्याची व्यवस्था करावी. तसे झाले नाही तर नाईलाजाने श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव ग्रामीणच्यावतीने त्या गाईंचे संरक्षण करून त्यांना गोशाळेमध्ये सोडण्यात येईल, अशा आशयाचा तपशील पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.


