बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात दोन नवीन तालुक्यांची गरज असून, त्यासाठी सरकारवर दबाव आहे, असे स्पष्ट मत राज्याचे मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. जिल्हा विभाजनाची मागणीही त्यांनी जोरदारपणे मांडली असून, “माझीही इच्छा आहे की बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे,” असे ते म्हणाले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी बेळगाव जिल्हा क्रीडांगणात ध्वजारोहणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री जारकीहोळी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकार घेईल. हे निश्चित आहे की, विभाजन होणार आहे, पण नेमकी तारीख सांगता येणार नाही.
माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांच्या काळातील राजपत्रात केलेले जिल्हा विभाजनाचे निर्णय अद्याप लागू होणे गरजेचे आहे. त्या निर्णयांनुसार, बेळगाव जिल्हा तीन भागांमध्ये विभागला जावा. सहा विधानसभा मतदारसंघांसाठी एक जिल्हा असावा, असे आमचे मत असल्याचे जारकीहोळी म्हणाले.
जारकीहोळी यांनी यावेळी आरोग्य सुविधांवरही भर दिला. ते म्हणाले, “सध्या कोणालाही जिल्हा रुग्णालयात जायचे असल्यास बेळगावला यावे लागते. पण जर जिल्हा विभाजन झाले, तर तीन स्वतंत्र जिल्हा रुग्णालये तयार होतील, आणि त्यामुळे लोकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध होतील.
यावेळी इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “सरकारी जमिनी विकणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, अशा जमिनींच्या नोंदण्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारांना आम्ही खपवून घेणार नाही. औषध दुकानांमधील निष्काळजीपणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “औषधांची मुदत संपलेली आहे की नाही हे तपासणे दुकानदारांची जबाबदारी आहे.” शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी शासनाने 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
या पत्रकार परिषदेला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहमद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



