बेळगाव लाईव्ह : खानापूर शहरानजीक असलेल्या गांधीनगर येथील शनि मंदिर – हनुमान मंदिर परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या खून प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे समोर आले आहे. या घटनेत सुरेश उर्फ रमेश बंडीवड्डर (मूळ गाव तेग्गूर, सध्या राहणार गांधीनगर) याचा मृत्यू झाला असून, त्याच्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
यल्लाप्पा शांताराम बंडीवड्डर (वय 60)
यशवंत उर्फ अनिल यल्लाप्पा बंडीवड्डर (वय 25) सावित्री यल्लाप्पा बंडीवड्डर (वय 55)स्नेहा सुरेश बंडीवड्डर (वय 27) – मयत सुरेश यांची पत्नी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश याच्या पत्नी स्नेहा हिचे यशवंत उर्फ अनिल यल्लाप्पा बंडीवड्डर याच्याशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वीपासून स्नेहा पतीला सोडून अनिलच्या घरी राहू लागली होती. त्यामुळे मयत सुरेश हा सतत अनिलच्या घरी जाऊन शिवीगाळ करत होता.
याच कारणावरून, गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत गांधीनगर येथील शनि-हनुमान मंदिरात बैठक आयोजित केली होती. परंतु बैठकीदरम्यान वाद उफाळून आला आणि यल्लाप्पा बंडीवड्डर याने चाकूने सुरेशच्या पोटात वार केले. यामुळे सुरेश गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसर्गी, बैलहोंगलचे डीवायएसपी वीरेश हिरेमठ, खानापूरचे पोलीस निरीक्षक एल. एच. गोवंडी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस तपास वेगाने सुरू असून, फॉरेन्सिक लॅबचे पथकांने देखील तपासणी केली त्यांनी रक्ताचे नमुने व इतर पुरावे जमा केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नातेवाईक व मित्रांची कसून चौकशी केली जात आहे.
सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्याची नोंद व पुढील तपास सुरु असून, रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.


