बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या राकसकोप्प धरणाने यंदा पूर्ण पातळी गाठल्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणावर विधिवत गंगापूजन पार पडले.
या प्रसंगी बोलताना महापौर मंगेश पवार यांनी यंदा धरण पूर्ण भरल्यामुळे बेळगावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. तर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनीही पाणीपुरवठा प्रकल्पाची माहिती दिली.
हराच्या ५८ प्रभागांपैकी ४८ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम एल अँड टी कंपनीला दिले आहे. त्यापैकी दोन प्रभागांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम २६ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पाण्याची गळती टाळण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून, नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना महापौर मंगेश पवार यांनी दरवर्षीप्रमाणे गंगा पूजनाचा कार्यक्रम पार पडल्याचे सांगून अधिकाऱ्यांचा हवाला देताना यंदा राकसकोप जलाशयामध्ये शहरातील सर्व 58 प्रभागांना अखंड पुरेल इतका मुबलक पाणी साठा असल्याचे सांगितले. राकसकोप आणि हिडकल अशा दोन जलाशयांमधून शहराला पाणी पुरवठा होत असतो. या दोन्ही तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही. एल अँड टी कंपनीकडून 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी पाईपलाईन बदलण्याची कामे सुरू आहे. हा प्रकल्प काही ठिकाणी पूर्ण झाला तर पाण्याची आणखी बचत होणार आहे असे सांगून पूर्वीच्या जुन्या पाईपलाईनमुळे पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत असली तरी लवकरच नव्या पाईपलाईनमुळे पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल, असे महापौर मंगेश पवार यांनी स्पष्ट केले.
मनपा आयुक्त शोभा बी. यांनी राकसकोप जलाशयाच्या ठिकाणी केले जाणारे गंगापूजन आणि या जलाशयाचे पाणी कशा पद्धतीने शहरातील सर्व प्रभागांपर्यंत पोहोचवले जाते याची माहिती दिली. या जलाशयातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता शहरात पाच दिवसाआड होणारा पाणी पुरवठा चार दिवसाआड होऊ शकतो. यंदा दरवर्षीच्या तुलनेत खूप आधी राकसकोप जलाशयामध्ये मुबलक पाणी साठा झाला असून शहरवासीयांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेणार असून शहरवासीयांना एल अँड टी च्या माध्यमातून अखंड पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. शहर पाणी पुरवठ्याची जबाबदारी घेतलेल्या एल अँड टी कंपनीचे काम अतिशय चांगल्यारीतीने सुरू आहे असे सांगून बेळगाव शहरासाठी असणारी 24 तास पाणीपुरवठा योजना येत्या 2026 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास मनपा आयुक्त शुभा बी. यांनी शेवटी व्यक्त केला.


