बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चिकोडी उपविभागातील आठ पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहेत. हा प्रकार पाचव्यांदा घडला असून, यामुळे परिसरातील १६ गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या लोक पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत.
वेदगंगा, दूधगंगा आणि कृष्णा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. निपाणी तालुक्यातून वाहणाऱ्या वेदगंगा नदीवरील अकोळ-सिद्धनाळ, जत्राट-भिवशी आणि बारवाड-कुन्नूर हे पूल जलमय झाले आहेत. त्याचप्रमाणे, दूधगंगा नदीवरील कारदगा-भोज, भोजवाडी-कुन्नूर आणि मल्लिकवाड-दत्तवाड हे पूलही पाण्याखाली गेले आहेत.
याशिवाय, कृष्णा नदीवरील एकसंबा-दत्तवाड, कलोळ-येडूर आणि बावनसौदत्ती-मांजरी हे पूलही बुडाले आहेत. कृष्णा नदीमध्ये पाण्याची आवक वाढून ६७,००० क्युसेकपर्यंत पोहोचली आहे.




