सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात वाळवल्या!

0
6
 belgaum

बेळगाव लाईव्ह : साधारणपणे, आपण आपले ओले कपडे उन्हात वाळवतो. पण बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात मात्र दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे भिजलेल्या चलनी नोटा उन्हात वाळवण्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. ही घटना स्थानिक लोकांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने दैना उडवली होती. पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण परिसरात पाणी साचले आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिरात मोठा गोंधळ उडाला. या पावसामुळे मंदिराच्या दानपेटीतही पाणी शिरल्याने हजारो रुपयांच्या चलनी नोटा ओल्या झाल्या. आता या नोटा सुकवण्याचे काम मंदिराचे कर्मचारी युद्धपातळीवर करत आहेत.

सौंदत्ती आणि उगरगोळ यल्लम्मा डोंगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. दोन तासांहून अधिक काळ झालेल्या या पावसामुळे शहराचे रस्ते तलावांमध्ये रूपांतरित झाले. सौंदत्तीहून यल्लम्मा डोंगराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या या वादळी पावसामुळे शहरातील नाले, ओढ्यांना पूर आला. यामुळे अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, झाडे उन्मळून पडली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय, चिपुंबी आणि उगरगोळ गावांमध्ये गटारीचे पाणी घरात शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अनेकांनी पाणी काढण्यातच रात्र घालवली.

 belgaum

अतिवृष्टीमुळे मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण परिसरात सुमारे तीन फूट पाणी साचले होते. यामुळे दानपेटीतही पाणी शिरून आतील नोटा आणि नाणी पूर्णपणे भिजल्या. पाण्यामुळे भिजलेल्या नोटांना कुंकू, अक्षता आणि फुलांचा रंग लागल्याने त्या पिवळ्या झाल्या. मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दानपेट्या फोडून या ओल्या नोटा बाहेर काढल्या आणि त्या वाळवण्यासाठी मंदिराच्या आवारात धान्यासारख्या ढिगाऱ्यांनी पसरवल्या आहेत.

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली. मंदिराच्या आवारात साचलेले पाणी बाहेर काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यल्लम्मा देवी विकास प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता भक्तांना दर्शनासाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून, भाविक रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे भविष्यात अशा नैसर्गिक आपत्त्यांचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.