बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील खराब झालेल्या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यासह अन्य रस्त्यांची येत्या 23 ऑगस्टपर्यंत ताबडतोब दुरुस्ती करावी. अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खाते बेळगावचे कार्यकारी अभियंता एस एस सोबरद यांना सादर करण्यात आले. अभियंता सोबरद यांनी निवेदनाचा स्वीकार करून श्री गणेशोत्सवापूर्वी लवकरात लवकर तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले.
गेल्या मे आणि जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः बेळगाव -वेंगुर्ला रोड, उचगाव बेकिनकेरी रोड, मच्छे ते संतीबस्तवाड रोड, वाघवडे रोड आणि बेळगाव तालुक्यातील इतर रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. रस्त्यांचे नुकसान झाल्यामुळे सार्वजनिक आणि ग्रामस्थांना रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे अनेक समस्या आणि गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.
या महिन्यात गणेशोत्सव असल्याने सार्वजनिक आणि गावातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या 23 ऑगस्ट 2025 पर्यंत म्हणजे गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती आम्ही करतो, अन्यथा आम्हाला रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, अशा आशयाचा तपशील मुख्य कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर यांनी बेळगाव तालुक्यातील विशेष करून हिंडलगा ते बाची रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे या नव्याने डांबरीकरण करावे, हा रस्ता चौपदरी करावा, अशी आम्ही गेल्या वर्षभरापासून मागणी करत आहोत. तथापि अद्यापपर्यंत कोणतीही कृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता श्री गणेश चतुर्थीचा तोंडावर आली असल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवून किमान पॅचवर्क तरी केले जावे. जेणेकरून लोकांना श्री गणेशाची मूर्ती घेऊन जाताना अडथळा निर्माण होणार नाही. सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात पाण्याने भरलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे. दुर्दैवानं त्या भागातील आमदार व इतर लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहेत ही मंडळी बेळगावचे बारामती करणार असे म्हणत असते तरी प्रत्यक्षात त्यांनी बेळगावचे पूर्ण बारा वाजवलेले आहेत त्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी सदर प्रमुख रस्त्यांसह खराब झालेल्या इतर रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती झाले नाही तर आम्हाला नाईलाजाने रस्ता रोको आंदोलन छेडावे लागणार आहे असे सांगून माजी आमदार किनेकर यांनी तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची थोडक्यात माहिती दिली.
समिती नेते आर. एम. चौगुले यांनी समितीने केलेल्या मागणीबद्दल थोडक्यात माहिती देऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी येत्या 10 दिवसात श्री गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या आश्वासन दिले असल्याची माहिती दिली. याप्रसंगी लक्ष्मण होणगेकर, रामचंद्र मोदगेकर, आर. के. पाटील, अनिल पाटील, लक्ष्मण पाटील, सागर सावगांवकर, नारायण सावगांवकर, कमल मनोळकर, मनोहर मनोळकर आदींसह बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.


