बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात तीन वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करून वावरणाऱ्या चौघा जणांना काल शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे श्रीकांत मुरगप्पा यक्कुंडी (वय 25, रा. कन्नड शाळेशेजारी महांतेशनगर, बेळगाव), महबूब बाबासाहेब देसाई (वय 54, रा. महांतेशनगर, सध्या 13 वा क्रॉस उज्वलनगर, बेळगाव), शंकर गोपाळ कांबळे (वय 48, रा नाझर कॅम्प बेळगाव) आणि केशव राकेश जंतीकट्टी (रा. बालकृष्णनगर, यरमाळ रोड बेळगाव) अशी आहेत.
यापैकी श्रीकांत यक्कुंडी हा काल महांतेशनगर येथील रागा हॉटेल जवळ असबध्द वर्तन करत असल्याचे आढळून आल्यामुळे माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होण्णप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने कोणतीतरी नशा केल्याचे निदर्शनास आले.
दुसऱ्या घटनेत महबूब देसाई हा मध्यवर्ती बस स्थानक येथे सार्वजनिक ठिकाणी विचित्र वर्तन करत असल्याचे आढळून आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महबूब याला ताब्यात घेतले असता त्याने नशाबाजी केल्याचे आढळून आले. तिसऱ्या घटनेत शंकर कांबळे आणि केशव जंतीकट्टी हे दोघे काल शुक्रवारी आरपीडी रस्त्यावरील जेल शाळेजवळ नशेमध्ये अनैसर्गिक वर्तन करताना आढळून आले.
त्यामुळे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. उपरोक्त चौघाही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांनी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चौघांनाही अटक करण्यात आली असून याप्रकरणी माळमारुती, मार्केट आणि शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.



