बेळगाव लाईव्ह : दहा वर्षांच्या बालिकेवर पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने तीस वर्षांचा कारावास ठोठावला.
अतिरिक्त जिल्हा व सत्र विशेष जलदगती पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी हा निकाल दिला. दत्तात्रय हणमंत खानापुरे (मूळ रा. वड्डर छावणी, खासबाग, सध्या रा. सागरनगर झोपडपट्टी, कणबर्गी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सहा वर्षांपूर्वी १३ मे २०१९ मध्ये सदर आरोपीने १० वर्षांच्या बालिकेला
त्याच्या झोपडपट्टीत आणून तिच्यावर पाशवी अत्याचार केला होता. याप्रकरणी न्यायालयाने बारा साक्षी, २० कागदपत्रे व १६ मुद्देमाल तपासून संबंधित आरोपीला ३० वर्षांचा कठोर कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. सदर बालिकेला जिल्हा कायदा प्राधिकरणाच्या वतीने ४ लाखांची मदत देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत पाच वर्षाची मुदत ठेव ठेवण्याचेही आदेशात नमूद आहे. याप्रकरणी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.




