बेळगाव लाईव्ह : बेळगावचे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे स्वप्न येत्या रविवार दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी प्रत्यक्षात उतरणार असून त्या दिवशी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून केएसआर बेंगलोर-बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे क्र. 26751/52 चा शुभारंभ केला जाणार आहे.
भारतीय रेल्वे कर्नाटकातील रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये आधुनिक सेवांची भर घालून त्यांचे जाळे वाढवत आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या 10 जोड्या कर्नाटकातून विविध ठिकाणी प्रवासाची कार्यक्षमता आणि आरामदायीता वाढवत धावत आहेत. उत्तम प्रवास अनुभव प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे प्रादेशिक संपर्क (कनेक्टिव्हिटी) आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या अत्यंत जलद गती रेल्वे (हाय स्पीड ट्रेन) सेवांचा आणखी विस्तार करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवार दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:15 वाजता बेंगलोर येथे 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. या तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये केएसआर बेंगलोर ते बेळगाव विशेष रेल्वे क्र. 06575 एसबीसी -बीजीएम (एकेरी), अजनी (नागपूर) ते पुणे (आभासी पद्धतीने) आणि श्री माता वैष्णो देवी कटरा ते अमृतसर (आभासी पद्धतीने) या रेल्वेंचा समावेश आहे.
नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाकडून हुबळी आणि धारवाड रेल्वे स्थानकांवर एन-रूट स्वागत समारंभ, त्याचप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानकावर देखील वंदे भारत रेल्वेचे भव्य स्वागत समारंभाचे आयोजन केले जाणार आहे.


