बेळगाव लाईव्ह :”गेल्या आर्थिक वर्षात पायोनियर अर्बन बँकेकडे 184 कोटी 50 लाखाच्या ठेवी जमा झाल्या असून या आर्थिक वर्षात एक कोटी सहा लाख 82 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे”अशी माहिती पायोनियर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी दिली.
बँकेची 119 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 31 ऑगस्ट रोजी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली बेळगाव येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, “बँकेकडे 2 कोटी 37 लाख 81 हजार चे भाग भांडवल असून 23 कोटी 14 लाख 18 हजाराचा राखीव निधी आहे. बँकेने वेगवेगळ्या प्रकारची 135 कोटी रुपयांची कर्ज वितरीत केली आहेत.”
“गेल्या आर्थिक वर्षात बँकेने हिंडलगा, कणबर्गी व वडगाव येथे नविन शाखा सुरू केल्या असून आता बँकेच्या एकूण सात शाखा कार्यरत आहेत. बँकेने आपल्या मार्केट यार्ड येथील शाखेचे नूतनीकरणही केले असून नव्या सर्व शाखा वातानुकूलित केल्या आहेत. या सर्व शाखा उत्तम प्रकारे कार्यरत असल्याची माहितीही अष्टेकर यांनी दिली.
भारतीय रिझर्व बँकेच्या कार्यप्रणालीनुसार व आदेशानुसार बँकेचे कामकाज चालते. बँकेने सभासदांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून बँक कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा विविध योजना राबविल्या आहेत.
बँकेच्या 119 वर्षाच्या कारकिर्दीत सलग चौथ्यांदा बँकेला ऑडिट रेटिंग ‘ए’ मिळाले असून बँकेने प्रथमच 184 कोटीच्या ठेवीचा टप्पा ही पार केला आहे बँकेचा निव्वळ एन पी ए 1.34% आहे. ए वर्ग भागधारकांना पंधरा टक्के आणि ब वर्ग भागधारकांना आठ टक्के लाभांश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभासदांच्या मुलांच्या गौरव :
विविध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा रोख रक्कमेचे पुरस्कार देऊन गौरव करण्याचा समारंभ या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी होणार असून सभासदांच्या होतकरू पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी यंदा केली जात आहे.
बँकेच्या संचालक मंडळात सौ सुवर्णा शहापूरकर या व्हाईस चेअरमन असून अनंत लाड, रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील ,गजानन पाटील, सुहास तराळ, यल्लाप्पा बेळगावकर ,गजानन ठोकणेकर, श्रीकांत देसाई, मल्लेश चौगुले ,मारुती शिगीहल्ली, अरुणा काकतकर हे संचालक आहेत .बसवराज इट्टी व रोहन चौगुले हे तज्ञ संचालक आहेत.
रिझर्व बँकेच्या आदेशानुसार पायोनियर बँकेने व्यवस्थापन मंडळ स्थापन केले असून त्याचे चेअरमन अनंत लाड हे आहेत तर गजानन पाटील, नितीन हिरेमठ ,ज्ञानेश्वर सायनेकर, कमलेश मायानाचे हे संचालक असून अनिता मूल्या या सीईओ म्हणून काम पाहत आहेत.





