बेळगाव लाईव्ह : NWKRTC (उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळ)च्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने नियमित बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
बेळगाव मध्ये दररोज सुमारे ७०० बस धावतात, चिक्कोडी डेपोमधील ६६८ बस देखील धावत असतात साधारणपणे ४,३०० कर्मचारी विविध मार्गांवर कार्यरत असतात. मात्र, मंगळवारी सकाळपासून एकही बस डेपोतून बाहेर पडलेली नाही. केवळ काही दूरच्या गावांमधून येणाऱ्या मोजक्या बस बेळगाव बसस्थानकापर्यंत पोहोचल्या आहेत.
या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्केट पोलीस स्टेशनचे पोलीस, ज्यात एक CPI आणि तीन PSI यांच्यासह त्यांचे पथक, मुख्य बसस्थानकावर दाखल झाले आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि संपामुळे कोणताही अनुचित प्रकार किंवा गोंधळ होणार नाही याची खबरदारी घेत आहेत.
मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बेळगाव केंद्रीय बस स्थानकाला भेट दिली आणि पाहणी केली. निवांत खात्याचे कर्मचारी संपावर जरी असले तरी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि जास्तीत जास्त बस सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे परिवहन खात्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.




