बेळगाव लाईव्ह : बेळगावातील श्री गणेश फेस्टिव्हलचा यंदाचा समारोप सोहळा ‘नवरत्न सत्कार’ समारंभाने मोठ्या उत्साहात पार पडला. सालाबादप्रमाणे १९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलची सांगता आज ‘नवरत्न सत्काराने’ झाली.
गेली २४ वर्षे बेळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या फेस्टिव्हलने केवळ एक धार्मिक उत्सव न राहता, तो समाजाला योग्य दिशा देणारे एक ‘विचारपीठ’ बनले आहे. या वर्षी साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ ‘नवरत्नांचा’ गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली. मनोहर देसाई, अभिजित चव्हाण आणि सुनील पाटील यांच्या हस्ते गणेशाची पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री राजमाता महिला सहकारी संस्था, श्रीभक्ती महिला सहकारी पतसंस्था आणि श्रीमाता सहकारी पतसंस्था यांच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, संचालिका आणि ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते गणेशवंदना पार पडली.
श्री गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक मनोहर देसाई यांनी प्रास्ताविक करताना, बेळगावचा गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून तो आपली संस्कृती, परंपरा आणि एकजूट जपण्याचा सोहळा आहे, असे सांगितले. २००२ साली सुरू झालेल्या या फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश समाजाला विधायक दिशा देणे हा होता.
गेल्या २४ वर्षांत या फेस्टिव्हलने सण साजरा करताना होणाऱ्या अनावश्यक खर्चांना आळा घालणे, निरर्थक गोष्टी टाळणे, तसेच चैनीसाठी कर्ज काढून समारंभ करण्याऐवजी साध्या आणि विधायक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे विचार समाजात रुजवले आहेत. सांस्कृतिक, समाजाभिमुख, मनोरंजनात्मक कार्यक्रम यासह महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे मनोहर देसाई यांनी सांगितले.
समाजाच्या उन्नतीसाठी पडद्यामागे काम करणाऱ्या ‘नवरत्नांचा’ गौरव करणे, हे या फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य आहे. गेली २४ वर्षे या व्यासपीठावर सर्वसामान्य पण समाजासाठी महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होत आहे. यावर्षीही साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी अशा विविध क्षेत्रांतील नऊ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये संतोष दरेकर (समाजसेवक), मीरा तारळेकर (साहित्यरत्न), वैभव लोकूर (नाट्यभूषण), सीमा कुलकर्णी (संगीतरत्न), सतिश लाड (उद्योगरत्न), राम पवार (क्रीडा रत्न), अनिता राऊत (श्रमसेवा), आशा नाईक (कृषिरत्न) आणि दुर्गवीर प्रतिष्ठान (सामाजिक संस्था) यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री गणेश फेस्टिव्हलच्या कार्याचे आणि त्यांनी दिलेल्या सन्मानाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुधा सांबरेकर यांनी केले, तर श्रीकांत काकतीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला श्री गणेश फेस्टिव्हलचे पदाधिकारी, संयोजक, आयोजक, विविध संस्था आणि सहकारी पतसंस्थांचे सदस्य तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


