बेळगाव लाईव्ह :”मुंबई चे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शकर शेट यांच्या कार्यासाठी पद्मपुरस्कार दिला जावा, त्यांच्या कार्यावर युवापिढीनी पीएचडी करावी” असे विचार काकडे फौंडेशन चे अध्यक्ष किशोर काकडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.
बेळगाव येथील दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेतर्फे कै.नाना शंकरशेट यांच्या 160 व्या पुण्यतिथी निमित्त गुरुवारी सकाळी संयुक्त महाराष्ट्र चौक,नाना शंकरशेट मार्गावरील हनुमान मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
“भारतातच नव्हे एशियातील पहिली रेल्वे मुंबईच्या रुळावरुन धावण्याचे श्रेय नानांना द्यावी लागते. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी आपला वाडा देणारे, राजा राम मोहन रॉयंच्यासह सती प्रथा बंद करण्यात पुढाकार, सागरी सेवा, रस्त्यावर गैसचे दिवे, राणीचा बाग अशा कितीतरी योजना, सुविधा ब्रिटिशांकडून नानानी करवून घेतल्या.
मराठी, गुजराती, संस्कृत भाषेतुन शिक्षण, एल्फीस्टन कॉलेजची उभारणी, केवळ संपत्तीची नव्हे तर कर्तृत्वाची श्रीमंती त्यांच्याकडे होती.”
असेही ते म्हणाले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुवर्ण लक्ष्मी सोसायटीचे चेअरमन आणि दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर हे होते तर व्यासपीठावर नगरसेवक शंकर पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेर्णेकर, विजय सांबरेकर, विनायक कारेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
किशोर काकडे यांच्या हस्ते नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन सौ मधूरा शिरोडकर यांनी केले.


