बेळगाव: मुतगा येथील शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम असून, शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करून घेण्यासाठी शेतकरी आणि आंदोलक सचिन पाटील हे डीसीसी बँकेत ठाण मांडून बसले आहेत. सचिन पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचे बिनव्याजी कर्ज गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करत आहेत, मात्र त्यांना यश आलेले नाही. सचिन पाटील यांनी या मागणीसाठी चौथ्यांदा उपोषण केले आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, संघाचे सरकारी ऑडिट पूर्ण झाले असून, ऑडिट रिपोर्ट डीसीसी बँकेला पाठवण्यात आला आहे. बँकेचे संचालक मंडळ पुढील निर्णय घेईल आणि लवकरच कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, जोपर्यंत खात्यावर बिनव्याजी कर्ज जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष सुनील अष्टेकर बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांना बिनव्याजी मिळणारे कर्ज गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून मिळणे बंद झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी सातत्याने कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करत आहेत, मात्र त्यांना यश आलेले नाही. आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांनुसार कोणत्याही परिस्थितीत कर्ज मंजूर करूनच घेणार आहोत” असे ते म्हणाले.
संस्थेच्या विद्यमान संचालकांनी स्वतःच्या नावावर तसेच स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावावर कर्ज उचलले आहे, त्याची थकबाकी शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळत नसल्याची माहिती डीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तर शेतकऱ्यांना कर्ज मंजूर न होण्याचे मुख्य कारण संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाची थकबाकी असल्याचे समोर आले असून विद्यमान संचालकांनी स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर कर्ज घेतले आहे, आणि त्याची थकबाकी शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. मुतगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे कर्ज मिळावे, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. आज कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी कर्ज मंजूर करूनच घेण्याचा निर्धार सागर पाटील यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शिवाजी यांच्यासह मुतगा येथील शेतकरी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शेतकऱ्यांच्या या एकजुटीमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, आता यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


