बेळगाव लाईव्ह: खानापूर शहरानजीक असलेल्या गांधीनगर परिसरात आज दुपारी किरकोळ वादातून चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सुरेश उर्फ रमेश भीमा बंडीवड्डर (वय ३०) याचा मृत्यू झाला आहे.
गांधीनगर येथील शनि मंदिर व मारुती मंदिर परिसरात सुरेश उर्फ रमेश बंडीवड्डर व यल्लाप्पा बंडीवड्डर (वय ६२) यांच्यात सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी बैठक बोलावण्यात आली होती.
मात्र, वाद मिटण्याऐवजी त्यातच अधिक तीव्रता येऊन यल्लाप्पा यांनी रमेश याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. हल्ला इतका गंभीर होता की सुरेश उर्फ रमेश याच्या पोटातील आतडी बाहेर आली होती.
गंभीर जखमी अवस्थेत रमेशला तातडीने खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी बेळगावला हलवले जात असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर खानापूर पोलिसांनी तात्काळ शनि मंदिर-मारुती मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.


