बेळगाव लाईव्ह :केवळ 500 रुपयांच्या वाटणीवरून झालेल्या मारामारीचे पर्यवसन एकाचा खून होण्यामध्ये झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावामध्ये नुकतीच घडली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
खून झालेल्या इसमाचे नांव हुसेन गौससाब तासेवाले (वय 45, रा. प्रताप गल्ली, येळ्ळूर) असे आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांनी नावे मिथुन महादेव कुगजी आणि मनोज चांगाप्पा इंगळे (दोघे रा. येळ्ळूर) अशी आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परमेश्वरनगर येळूर येथून उचललेले भंगार (स्क्रॅप) साहित्य विकून हुसेन याने 500 रु. मिळविले होते.
त्यामधील आपली वाटणी मागण्यासाठी मनोज व मिथुन गेल्या शनिवारी रात्री हुसेनच्या घरी गेले होते. त्यावेळी भंगाराच्या पैशावरून झालेल्या वादावादी नंतर या दोघांनी हुसेन याला मारहाण केली. त्या मारहाणीत हुसेनच्या गुप्तांगाला मार बसून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींची सध्या अधिक चौकशी केली जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.



