कन्नड सक्तीविरुद्ध युवा समिती सीमाभागाचे आम. विठ्ठल हलगेकर यांना निवेदन

0
8
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागात लादण्यात येत असलेल्या कन्नड सक्तीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्या वतीने खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेण्यात आली. कन्नड सक्ती मागे घेण्यासोबतच, बसस्थानक आणि शासकीय कार्यालयांवर मराठी फलक लावण्याची मागणी करत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागातर्फे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शुभम शेळके यांनी कन्नड सक्ती त्वरित मागे घेण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची विनंती आमदारांना केली. एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी कन्नड सक्ती केली जात असल्याने मराठी भाषकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. “तुम्ही स्वतः मराठी भाषिक असल्यामुळे या कन्नड सक्तीचा मनस्ताप तुम्हालाही होत असेल. त्यामुळे तुम्ही हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा,” अशी विनंती करण्यात आली.

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी आमदारांना मागील निवेदनाची आठवण करून देताना सांगितले की, खानापूर येथे नव्याने झालेल्या बसस्थानक, रुग्णालय आणि हेस्कॉम कार्यालयावर कन्नड भाषेसह मराठीत फलक लावण्यात आलेले नाहीत. या निवेदनातील कलमांसह भाषिक अल्पसंख्याकांबाबत असलेल्या कायदेशीर बाबी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कानावर एका राष्ट्रीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर मराठी भाषकांचा लोकप्रतिनिधी म्हणून घालाव्यात आणि मराठी भाषकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी आमदार हलगेकर यांना केले.

 belgaum

यावर विठ्ठल हलगेकर यांनी आश्वासन दिले की, “मी स्वतः मराठी भाषकांच्या मतांवर निवडून आलो आहे. त्यामुळे कन्नड सक्ती थांबली पाहिजे, या मताचा मीही आहे. तुम्ही मराठी वाचवण्यासाठी जे कार्य करत आहात, याचा मला अभिमान आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून योग्य ती कारवाई तात्काळ करण्याची विनंती करतो.”

खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती सुरेश देसाई, यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, महादेव पाटील, शिवाजी हावळण्णाचे, पिराजी मुंचडीकर, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, रमेश माळवी, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, जोतिबा येळ्ळूरकर, अशोक डोळेकर, प्रतिक गुरव, सचिन दळवी, अशोक घगवे, महेंद्र जाधव, विजय जाधव, सुरुज जाधव, राजू पाटील, प्रवीण पाटील, उमेश पाटील, नीलेश काकतकर, साईराज कुगजी, ज्ञानेश्वर चिकोर्डे, प्रशांत बैलूरकर, अभिषेक कारेकर, शुभम जाधव, रोशन पाटील, श्रीकांत नादूंरकर, शंकर पाखरे, शुभम पाटील, भरत पाटील, किरण पाटील, विनायक सुतार, प्रसाद पाटील, भरमाणी पाखरे, राजू पावळे, रामलिंग चोपडे, जोतिबा चोपडे, वैभव पाटील, प्रशांत पाटील, ओंकार पाखरे, संजय पाटील, विनायक पाटील, मल्लाप्पा मदार, शुभम जाधव, सागर कणबरकर, विनायक हुलजी, सुर्याजी पाटील, प्रतिक देसाई, राजू पाटील, बळीराम पाटील, साईराज कुगजी यांच्यासह अनेक मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.