बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती तालुक्यातील हुलिकट्टी गावातील एका सरकारी प्राथमिक शाळेत, मुस्लिम मुख्याध्यापकाची बदली करण्यासाठी मुलांच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याच्या जुन्या घटनेवरून आता बेळगावात संतापाचे वातावरण आहे.
या घटनेच्या निषेधार्थ, बेळगावच्या मुस्लीम समाजाच्या संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
या प्रकरणी श्री राम सेनेचे तालुकाध्यक्ष सागर पाटील, नागनागौडा पाटील आणि कृष्णा मादर यांनी हुलिकट्टी शाळेचे मुख्याध्यापक सुलेमान घोरी नायकर यांची बदली करण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळ केला होता. या तिन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि राज्यात जातीय सलोखा बिघडवणाऱ्या श्री राम सेनेवर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी श्री राम सेनेवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे, आता मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या संघटनेवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते सोहिल संगोळी, नगरसेवक शाहीर पठाण, शकील मुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




