भाषिक अल्पसंख्यांक अधिकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासन

0
25
 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाषिक अल्पसंख्यांकांचे अधिकार पायदळी न तुडवता कन्नड सक्ती मागे घेऊन बेळगाव शहरासह बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लपवलेले किंवा काढून टाकलेले कन्नडसह मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले नामफलक ताबडतोब पूर्ववत बसवावेत, सरकारी परिपत्रके कन्नडसह मराठी भाषेत द्यावीत वगैरे विविध मागणीचे निवेदन असंख्य मराठी भाषिकांच्या उपस्थितीत मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

अलीकडे सुरू असलेल्या कन्नड सक्तीला विरोध दर्शविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारून मोर्चा ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) निवेदन सादर करण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्याचा आदर राखून मोर्चा ऐवजी बहुसंख्येने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हजारोंच्या संख्येने जमून मराठी भाषिकांची ताकद दाखवण्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज सोमवारी सकाळी प्रचंड संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रचंड संख्येने जमलेल्या मराठी भाषिकांनी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले.

निवेदन सादर करण्यापूर्वी माजी आमदार मनोहर किनेकर यांनी निवेदनातील मागणीची जिल्हाधिकाऱ्यांना थोडक्यात माहिती दिली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे कन्नड सक्ती थांबलीच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. या खेरीज जमिनीचे उतारे रेशन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र दाखले आणि इतर सरकारी परिपत्रके कन्नड सोबत मराठीमध्ये उपलब्ध करून द्या, सरकारी योजनांची माहिती मराठीत उपलब्ध करा, मराठी भाषिकांनो जागे व्हा वगैरेंसारखे मराठी भाषिकांनी हातात धरलेले विविध मागण्यांचे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

 belgaum

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन नेमकं काय म्हणाले?

निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, आपण पोलीस आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन मोर्चा न काढता शांततेने निवेदन सादर करण्यास आल्याबद्दल मी तुमचा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने आभारी आहे. आम्ही तुमच्या मागणी संदर्भात प्रदीर्घ चर्चा कर केली असून याचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे घटनेनुसार अधिकारांचे संरक्षण करणे आणि कर्नाटक सरकारच्यावतीने एक सरकारी अधिकारी म्हणून आम्ही त्यासाठी बांधिल आहोत. घटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे.

त्या आधारावर आपल्या मागणी संदर्भात निश्चितपणे कारवाई केली जाईल असे मी ठोस आश्वासन देतो. याव्यतिरिक्त तुमच्या या मुद्द्यावर एक शाश्वत उपाय काढणे हा पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी म्हणून माझा एकच दृष्टिकोन आहे. त्यासाठी आम्हाला वाटतं की कर्नाटक महाराष्ट्र सेनेच्या दोन्ही बाजूच्या ज्या मुख्य कार्यकारी व्यक्ती आहेत त्यांनी एकत्र येऊन चर्चेद्वारे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढावा त्यासाठी देखील जिल्हा प्रशासन सहकार्य करून कार्य करेल आमची इच्छा आहे की या देशात या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यात कायम शांती, सौहार्द कायम राहिले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी आज या निवेदनाचा स्वीकार करत आहे असे सांगून मी जे आदेश जारी करणार आहे जे मी पोलीस आयुक्तांच्या देखील कानावर घातले आहेत ते आदेश लवकरच जारी केले जातील, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे हे देखील जातीने उपस्थित होते.

त्यावर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचे आभार प्रकट करताना समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी आम्ही देखील जिल्हाधिकाऱ्यांचा विनंतीचा मान राखून आगामी श्री गणेशोत्सव शांततेत पार पडून त्यांनी दिलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारचा संघर्ष करणार नाही. आमच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे सहकार्य आम्ही जिल्हा प्रशासनाला देण्यास तयार आहोत. मोर्चा नसला तरी निवेदन सादर करण्यास परवानगी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शहर पोलीस आयुक्तांचे आभार मानतो, असे सांगितले.

याप्रसंगी सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजीत -चव्हाण पाटील, आर. एम. चौगुले, समिती नेते रमाकांत कोंडुसकर बेळगाव सीमाभाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी आमदार दिगंबर पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर वैशाली भातकांडे ,विकास कलघटगी, आर एम चौगुले,वकील अमर येळळूरकर, नागेश सातेरी, महेश बिर्जे, सतीश पाटील दुधापा बागेवाडी, सरस्वती पाटील दीपक पावशे, साधना पाटील, वैशाली हुलजी, शहर व तालुक्यातील बहुसंख्य मराठी भाषिक उपस्थित होते.

कन्नडसक्ती विरोधातील निवेदन देण्यास असलेले महाराष्ट्र एकीकरण समिती येळळूरचे कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता उघाडे, वामनराव रवळू पाटील माजी APMC सदस्य, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, राजू पावले, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेक, माजी ग्रामपंचायत शिवाजी सदस्य, प्रकाश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सतिश देसुरकर, माझी ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद उघाडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश परिट ग्रामपंचायत सदस्य, नागेश बोबाटे, सुरज गोरल, नंदू पाटील, सतीश कुगजी, यलुपा पाटील, प्रभाकर मंगणाईक, शिवाजी पाटील, प्रकाश मालुचे, रमेश धामनेकर, प्रदीप मुरकुठे, रमेश धामनेकर, भिमराव पुण्याणावर, शिवाजी जाधव, प्रकाश मालूचे, कृष्णा शहापुरकर, कृष्णा बिजगरकर, परशराम कणबरकर, पपू कुंडेकर, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.