बेळगाव लाईव्ह :कन्नड सक्तीच्या विरोधात मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या सोमवारी 11 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या महामोर्चाला वडगाव आणि जुने बेळगाव परिसरातून संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला असून समितीचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी आज रविवारी सकाळी मोर्चा संदर्भातील पत्रके वाटून जनजागृती मोहीम राबविली.
कन्नड सक्ती विरोधातील उद्याच्या महामोर्चासंदर्भात वडगाव आणि जुने बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांची आज रविवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चाला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून हजारोंच्या संख्येने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, कांही लोकांना हाताशी धरून कर्नाटक सरकार बेळगाव सीमाभागातील मराठी भाषा नामशेष करू पाहत आहे. गेल्या महिन्याभरापासून कांही निवडक लोकांच्या माध्यमातून प्रशासन येथील वातावरण गढूळ करू पाहत आहे. यासाठी समस्त मराठी भाषिकांच्यावतीने माझी प्रशासनाला विनंती आहे की कन्नडच्या बाबतीत जोर जबरदस्तीचा जो प्रकार चालू आहे तो त्यांनी तात्काळ थांबवावा. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आमचा मातृभाषेचा हक्क मागत आहोत याचा अर्थ असा नव्हे की आमचा अन्य भाषांना विरोध आहे, इतर भाषा चांगल्या बोलता येत असल्या तरी मराठी ही आमची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा असल्यामुळे या भाषेवर आम्हाला प्रचंड प्रेम आहे, तिचा अभिमान आहे.
तथापि प्रशासन आमची ही भाषा नष्ट करून पाहत आहे. या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषेचे जे स्थान आहे ते प्रशासनाने अबाधित ठेवावे. येथील मराठी माणसाने आजतागायत कन्नड अथवा इतर कोणत्याही भाषिकांवर अन्याय केलेला नाही. अशा चांगल्या मराठी समाजाला त्रयस्थांचे ऐकून त्रास देणे त्वरित थांबवावे. या अनुषंगाने उद्या सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामोर्चाला आम्ही आमच्या या भागातून संपूर्ण पाठिंबा व्यक्त करत आहोत, मोर्चामध्ये प्रचंड संख्येने सहभागी होणारा आहोत, असे रमाकांत कोंडुसकर यांनी शेवटी स्पष्ट केले.
बैठक समाप्त झाल्यानंतर मोर्चा संदर्भातील पत्रकांचे सार्वजनिक ठिकाणी वाटप करून वडगाव व जुने बेळगाव परिसरात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी बोलताना म. ए. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील म्हणाले की, घटनेने दिलेले अधिकार पायदळी तुडवून कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करण्यासाठी कन्नड सक्तीचा फतवा काढला आहे. मात्र मी सरकारला सांगू इच्छितो की त्यांनीच नामफलकांवर 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के इतर भाषा असा आदेश काढला आहे आणि आता स्वतःचाच हा आदेश डावलून सरकारने महापालिका व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीला हद्दपार केले आहे. यासाठीच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्याच्या मोर्चाचे आयोजन केले आहे. तेंव्हा आपण मराठी भाषिकांनी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन सरकारला पुन्हा एकदा आमची ताकद दाखवून देऊ या कसे आवाहन करून वडगाव जुने बेळगाव भागातून हजारो कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी होतील, अशी ग्वाही महादेव पाटील यांनी दिली.
एका स्थानिक नेते आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, कन्नड सक्तीच्या विरोधात उद्या सोमवारी 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज वडगाव जुने, बेळगाव या ठिकाणी बैठक घेऊन आज मोर्चा संदर्भात ही जनजागृती मोहीम राबवत आहोत. तरी उद्याच्या मोर्चामध्ये मराठी माणसांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन तो यशस्वी करण्यास सहकार्य करावे. गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाकडून मराठी भाषा व माणसांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषा संपवण्याचा घाट या सरकारने रचला आहे.
सरकारने कन्नड भाषेचा विस्तार वाढवण्याची मार्गदर्शक सूची जारी केल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले होते. तथापि कन्नडचा विस्तार वाढवा याचा अर्थ मराठी भाषेला संपवा किंवा मराठी माणसांवर अन्याय करून त्यांचे खच्चीकरण करा, असा होत नाही. यासाठीच उद्याच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही भाषेच्या विरोधात नाही, आमचा कन्नड सक्तीला विरोध आहे आणि म्हणूनच वडगाव जुने बेळगाव परिसरातील नागरिकांनी सर्वपक्षीय लोकांनी उद्याच्या मोर्चाला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
बेळगावसह सीमाभाग मराठी भाषिक आहे हे जगजाहीर आहे. पूर्वी संस्थानिक काळात शहापूर आणि येळ्ळूर असा तालुका होता, ज्यावर मराठी संस्थानिकांचे राज्य होते. मात्र आता प्रशासनाकडून घटनाबाह्य कृती करताना अतिरेकी कारवाई केली जात आहे. विशिष्ट संघटनेच्या प्रभावाखाली मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे असून याचा आम्ही कडाडून निषेध करतो. आम्ही चांगल्या प्रकारे कन्नड वाचू आणि लिहू शकतो आम्हाला कन्नड भाषेचा द्वेष नाही. मात्र मराठी मातृभाषा बोलण्याचा आमचा जो हक्क आहे तो हिरावून घेण्याची कृती बेकायदेशीर आहे. तेव्हा प्रशासनाने सदर प्रकार ताबडतोब थांबवावा, अशी प्रतिक्रिया अन्य एका नेत्याने व्यक्त केली. यावेळी मनोहर हलगेकर कीर्ती कुमार कुलकर्णी दिलीप नाईक ज्ञानेश्वर मन्नूरकर उमेश पाटील संतोष शिवनगेकर महेश जुवेकर भाऊ पाटील ज्योतिबा कुंडेकर पिंटू कुंडेकर दीपक होसुरकर मनोहर यलजी रणजीत चव्हाण पाटील गजानन होसुरकर बाळू खन्नूकर सुशांत तरळेकर आदी उपस्थित होते.


