बेळगाव लाईव्ह : कँटोन्मेंट मराठी शाळेत ‘तारांगण पहिले बालकवी संमेलन २०२५’ नुकतेच उत्साहात पार पडले. या संमेलनामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि वृक्षांना पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या संमेलनात महिला विद्यालय, मराठी विद्यानिकेतन बेळगाव, मराठा मंडळ हायस्कूल, कँटोन्मेंट शाळा आणि येळ्ळूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कविता सादर केल्या.
यात एकूण ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यांनी ‘सीमाप्रश्न’ आणि ‘शेतकरी राजा’ यांसारख्या विविध विषयांवर कविता सादर केल्या.
यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, ज्यात गोविंद मिसाळे, दैनिक ‘पुढारी’चे पत्रकार शिवाजी शिंदे, सरस्वती इन्फोटेकच्या पोमाना बेनके, विनोद बामणे, ज्योती बामणे, ॲड. सुधीर चव्हाण, साहित्यिक गुणवंत पाटील आणि मुख्याध्यापक यांचा समावेश होता.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पत्रकार शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “घडलेल्या प्रसंगाचे लेखणीतून उतरणारे वास्तव म्हणजे साहित्य. साहित्यिकांना शब्दांचे व्यसन असते.
ज्याला शब्दांचे वेड असते, तो आयुष्यात कधीच एकटा राहात नाही.” त्यांनी साहित्याचे महत्त्व पटवून देत पुढे म्हटले, “जन्माबरोबर श्वास आला, श्वासाबरोबर कविता. मृत्यूनंतर श्वास जाईल, पण माझी कविता कुठे जाईल…?” त्यांचे हे विचार विद्यार्थ्यांना खूप भावले. शिवाजी शिंदे यांनी पुढे सांगितले की, “साहित्यिकांचे जगणं आणि लिहिणं हे वेगळं नसतं. जे अंतरंगात असतं तेच साहित्यातून प्रकट होतं. शब्दांच्या वाटेवर चालणारे वारकरी म्हणजे आजचे बालसाहित्यिक.” अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात साहित्यिक गुणवंत पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण दिले. कविता सादर करणाऱ्या सर्व ३५ विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देवेन बामणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


