बेळगाव लाईव्ह :11 आगस्ट रोजी बेळगाव सह सीमा भागात कर्नाटक सरकारकडून राबविण्यात येणारी कन्नड सक्ती दूर करा आणि मराठी भाषिकांना भाषिक संख्याकाचे अधिकार द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली असून पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सीमाभागातील मराठी जनतेसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर याआधी पोलिस प्रशासनाने तडीपारीची नोटीस पुन्हा बजावली होती त्या नोटीस नुसार माळ मारुती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून पोलिस उपायुक्तांनी पुन्हा नोटीस दिली असून, ८ ऑगस्ट रोजी स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभागाचे अध्यक्ष असून, गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्यायहक्कासाठी आणि कन्नड सक्तीविरोधात ठाम भूमिका घेऊन कार्यरत आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना सतत प्रशासनाकडून टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप अनेक मराठी संघटनांनी केला आहे.
तडीपारीची ही नोटीस म्हणजे मराठी कार्यकर्त्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, ही कारवाई पूर्णपणे अन्यायकारक आहे, असा सूर मराठी समाजात उमटत आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी मतदार, कार्यकर्ते व नेत्यांना लक्ष्य करून दबाव आणण्याचे हे धोरण अलीकडच्या काळात राबवत असल्याचा आरोप होत आहे.
आगामी काळात या संदर्भात मराठी संघटना आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे.


