बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील सरकारी कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम सुरू केली आहे. बेळगाव महापालिका, स्मार्ट सिटी कार्यालय, तालुका पंचायत आणि उपनिबंधक कार्यालयासह विविध सरकारी कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या या चौकशीमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये विविध ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, लोकायुक्तांनी अचानक सुरू केलेल्या या तपासणीमुळे पाय मातीत रुतलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकायुक्त पथकाने बुधवारी उपनिबंधक कार्यालयात धाड टाकून चौकशी केली.
त्याच दिवशी, तालुका पंचायत कार्यालयातही सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत विविध विभागांची कसून तपासणी करण्यात आली. याव्यतिरिक्त, बेळगाव महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यालयातही चौकशी सुरू आहे.
आता या चौकशीनंतर कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


