बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यात आजपासून सुरू झालेल्या श्री गणेशोत्सवासह येत्या 5 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव जिल्ह्यामध्ये मद्य विक्रीवर निर्बंध घातले आहेत.
श्री गणेश चतुर्थी निमित्त आजपासून श्री गणेश आगमन व विसर्जन काळात कोणतीही अनुचित, अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य अर्थात दारू विक्रीची दुकाने, बियर बार बंद ठेवावेत, असा आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी बजावला आहे.
सदर आदेशाच्या अनुषंगाने ऐगळी, हारुगिरी, कुडची, रायबाग, गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 31 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 1 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विक्रीवर बंदी असेल. त्याचप्रमाणे अथणी, कागवाड, मुडलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वा.पासून 3 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत, सूरेबान व कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वा.पासून 5 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी असेल.


याखेरीज बैलहोंगल, नेसरगी, कित्तूर, खानापूर, नंदगड, चिक्कोडी, सदलगा, अंकली, निपाणी शहर, निपाणी ग्रामीण, निपाणी बीसीपीएस, खडकलाट, गोकाक शहर, अंकलगी, घटप्रभा, संकेश्वर, हुक्केरी, यमकनमर्डी, रामदुर्ग, कटकोळ सौंदत्ती आणि मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारू विक्रीवर 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वा.पासून 7 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध असणार आहे.
तसेच दोडवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 8 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत दारू विक्रीला निर्बंध असेल. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिला आहे.



