बेळगाव लाईव्ह : कन्नड रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठीविरोधी भूमिका मांडत बेळगावमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या काळात भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे फलक हटविण्यावरून सुरु झालेल्य्या या वादाने आता बेळगावमध्ये भाषिक तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याकडे कूच केली असून काल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना कन्नडसक्ती विरोधात देण्यात आलेल्या निवेदनानंतर कन्नड संघटनांच्या तथाकथित मूठभर कार्यकर्त्यांकडून गोंधळ माजविण्यास सुरुवात झाली आहे.
राणी चन्नम्मा चौकातून निदर्शने करत आज करवेच्या शिवरामगौडा गटाच्या काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती, नगरसेवक रवी साळुंके यांच्यावर बंदी घालावी अशी मागणी केली.
कन्नड सक्ती ऐवजी मराठीची मागणी करणाऱ्यांनी महाराष्ट्रात जाऊन राहावे असा अजब गजब सल्लाही यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात गरळ ओकत या तथाकथित कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या डोक्याचा व्याप वाढविला असून अशा कार्यकर्त्यांमुळे बेळगावचे वातावरण बिघडत चालले आहे.
केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचीच मागणी नव्हे तर चक्क भाषिक तेढ निर्माण करण्याच्या उलट्या बोंबा मारत रवी साळुंके यांना निलंबोत करावे अशीही मागणी या कार्यकर्त्यांनी केली. गणेशोत्सवासाठी लावण्यात आलेले मराठी भाषेतील फलक काढून टाकावेत अशीही केविलवाणी मागणी या ‘कार’कर्त्यांनी केली असून त्यांची मागणी हास्यास्पद असल्याची जोरदार चर्चा बेळगावमध्ये सुरु झाली आहे.


