बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारकडून बेळगावसह संपूर्ण सीमाभागात सक्तीची कन्नड भाषा लागू करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे मराठी भाषिकांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येत आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कन्नडसह मराठीतही शासकीय परिपत्रके मिळण्याचा अधिकार असतानाही, सीमाभागात सक्तीचे कानडीकरण केले जात आहे.
याविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात हा आवाज बुलंद करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट रोजी खानापूर तालुका म.ए. समितीच्या वतीने जांबोटी येथे जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. गावात फेरी काढून पत्रकांचे वाटप करण्यात आले आणि घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला. या वेळी “मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी या लढ्यात सहभागी व्हा” असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
सर्वत्र हे जाणवले जात आहे की १९५६ पासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असून, आजही १५ टक्क्यांपेक्षा अधिक मराठी लोकसंख्या असतानाही त्यांच्या भाषिक अधिकारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मराठी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सक्तीच्या कन्नडकरणाविरोधात उभारण्यात येणाऱ्या या आंदोलनात सहभागाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
या जागृती फेरीत खानापूर तालुका म.ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, समिती नेते राजाराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर, माजी ता.प. सदस्य पांडुरंग नाईक, मध्यवर्ती म.ए. समिती सदस्य वसंत नावलकर, रवींद्र शिंदे, बाबुराव भरनकर, राजू चिखलकर, विठ्ठल देसाई, रवींद्र देसाई, हणमंत जगताप, चंद्रकांत बैलूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते.
“मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता रक्षणासाठी सर्वांनी मिळून ११ ऑगस्टच्या मोर्चात सहभागी व्हा” असे साद म.ए. समितीच्या वतीने देण्यात आली आहे.




