बेळगाव लाईव्ह : गेल्या तीन चार महिन्यापासून खानापूर तालुक्यात सुरु असलेला जिल्हा मध्यवर्ती अर्थात डी सी सी बँक निवडणुकीतील चुरस संपण्याची चिन्हे दिसत आहेत. बुधवारी मोठी राजकीय घडामोड घडली असून खानापूर तालुक्यातून डी.सी.सी. बँक निवडणुकीसाठी लॉबिंग करत असलेले विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याची माहिती दिली आहे.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीतून विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची उमेदवारी मागे घेण्यात आली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.एका व्हिडिओ संदेशातून बोलताना पालकमंत्री जारकीहोळी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
“डीसीसी बँकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. काही ठिकाणी निवडणूक होत असून, काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ही निवडणूक कोणत्याही पक्षाच्या वतीने लढविण्यात येत नाही, ती पक्षविरहित आहे.”असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले आहे.

खानापूरमधून या निवडणुकीसाठी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी गेल्या काही महिन्यांपासून तयारीत होते. तालुक्यातील विविध पीकेपीएस सोसायट्यांच्या संचालकांशी त्यांनी संपर्क साधून चांगला प्रतिसाद मिळवला होत त्यांचे लॉबिंग हि जोरदार होते मात्र, जिल्ह्यातील एकंदर राजकीय परिस्थिती व राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
“डीसीसी बँक निवडणुकीबाबत हट्टीहोळी यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली. त्यातूनच त्यांच्या उमेदवारीबाबत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर खुलासा करून माहिती देण्यात येईल,” असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.या निर्णयामुळे खानापूर तसेच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण तर मिळाले आहेच या शिवाय खानापूर तालुकयातील चुरस देखील संपुष्टात येण्याची शकयता आहे.



मागील टर्म मध्ये अरविंद पाटील विरुद्ध माजी आमदार अंजली निंबाळकर असा सामना जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाहायला मिळाला होता यंदा तो अरविंद पाटील विरुद्ध चन्नराज हट्टीहोळी असा रंगणार होता मात्र पालकमंत्र्यांच्या वक्तव्या नंतर खानापूर मधील निवडणूक बिन विरोधाच्या दिशेने वाटचाल करत आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. अरविंद पाटील याना स्थानिक उमेदवार कुणी आव्हान देणार का आयाबाबत हि चर्चा सुरु झाली आहे.


