बेळगाव लाईव्ह :कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या के-सेट परीक्षेतून मराठी विषय वगळल्यामुळे संबंधित विषयाची तयारी केलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्यामुळे के-सेट परीक्षेमधून मराठी विषय वगळू नये, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावने एका निवेदनाद्वारे कर्नाटक प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक एच. प्रसन्ना यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावने अध्यक्ष अंकुश केसरकर व सेक्रेटरी श्रीकांत कदम यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन एच. प्रसन्ना यांच्याकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने कर्नाटक राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (के-सेट 2025) 2 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे आहे, त्यासाठी 28 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या वर्षीच्या परीक्षेसाठी बेळगाव हे केंद्र म्हणून नियुक्त केले गेले आहे. तथापि, यावर्षी देण्यात येणाऱ्या 33 विषयांच्या यादीतून मराठी विषय वगळण्यात आला आहे. इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, हिंदी, शिक्षण, समाजकार्य, कायदा, शारीरिक शिक्षण, गृहविज्ञान, संगीत इत्यादी विषय आहेत, परंतु मागील वर्षांत समाविष्ट असलेल्या मराठी विषयाचा समावेश नाही.
राणी चन्नम्मा विद्यापीठ, धारवाड विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ आणि बिदर विद्यापीठ यासारख्या अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये मराठी हा एक प्रमुख विषय आहे, जिथे 1500 हून अधिक विद्यार्थी सध्या पदव्युत्तर आणि एम.ए.चे शिक्षण घेत आहेत. के-सेटमधून अचानक मराठी वगळल्याने प्राध्यापक म्हणून पात्र होऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या आकांक्षांवर गंभीर परिणाम होणार आहे. त्यांना ही संधी नाकारल्याने त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकिर्दीचे न भरून निघणारे नुकसान होणार आहे.
के-सेट ही वर्षातून एकदाच घेतली जाणारी एक महत्त्वाची पात्रता परीक्षा असल्याने येत्या के-सेट 2025 परीक्षेमध्ये मराठी विषयाचा अंतर्भाव करण्याचा पुनर्विचार केला जावा आणि मराठी भाषेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय आणि समान संधी मिळवून द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून टीईए घेतल्या जाणाऱ्या के-सेट परीक्षेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भविष्यातील प्राध्यापक घडत असतात. यंदा या परीक्षेच्या 33 विषयांमधून मराठी विषय वगळण्यात आला आहे.
हा बेळगावचे राणी चन्नम्मा विद्यापीठ, धारवाड विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ आणि बिदर विद्यापीठ या चार विद्यापीठांमधून मराठी विषय घेऊन एम.ए. करणाऱ्या साधारण 1500 ते 2000 विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. के-सेट परीक्षा देता येणार नसल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न भंगणार आहे. म्हणूनच त्यांच्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून के-सेट परीक्षेतून मराठी विषय वगळू नये अशी विनंती केली आहे, असे केसरकर यांनी सांगितले. निवेदन सादर करतेवेळी अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांच्यासह सचिन केळवेकर, वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, विनायक कावळे आदिंसह म. ए. युवा समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.




