बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कर्ले गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी वन विभागाच्या विरोधात तीव्र निषेध केला. वन विभाग शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
वन विभाग अनेक वर्षांपासून शेतीत असलेल्या जमिनींवर आपला हक्क सांगत आहे. या जमिनींवर शेतकरी वर्षानुवर्षे पिके घेत आहेत आणि हेच त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. असे असतानाही वन विभागाचे अधिकारी या जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
संतप्त ग्रामस्थांनी आपल्या मागणीचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असून या निवेदनात, वन विभागाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते,
यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून वन विभागाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.


