बेळगाव लाईव्ह : कपिलेश्वर गणेशोत्सव चौकात यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात सामाजिक भान दाखवणाऱ्या उपक्रमाने झाली.
शांताई वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आरतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. गणरायाच्या साक्षीने झालेली ही आरती भक्तिभावाने भारलेली होती आणि आजी-आजोबांच्या हस्ते झाल्याने ती अधिकच मंगलमय ठरली.
या उपक्रमाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी सांगितले की, कपिलेश्वर गणेशोत्सव चौकात यावर्षी संपूर्ण ११ दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
“गणेशोत्सव म्हणजे केवळ सजावट आणि मनोरंजन नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते. याच भावनेतून या उपक्रमांची रचना केली आहे,” असे ते म्हणाले.

इतर गणेश मंडळांनीही अशाच प्रकारचे उपक्रम राबवावेत, अशी प्रतिक्रिया संजय वालावलकर यांनी व्यक्त केली. “या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. श्रद्धा आणि सेवा एकत्र आल्यासच उत्सवाची खरी फलश्रुती साधता येते,” अशा शब्दांत त्यांनी आवाहन केले.
आरतीनंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांना कपिलेश्वर दक्षिण काशी येथे दर्शनासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यासाठी खास भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमामुळे गणेशोत्सवाला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक अधिष्ठान लाभले. वृद्धांचा सन्मान करतानाच, भक्ती आणि बांधिलकी यांचा संगम साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.
या वेळी कपिल भोसले, पप्पू लगडे, अॅलन विजय मोरे, दीपक जाधव, अशोक जाधव, संजय वालावलकर, विनायक जाधव, राहुल पाटील, आकाश हुलियार, संतोष देवर, यशवंत राजपूत, श्री जाधव, अरविंद देवर, सुधीर यादव आणि अरुण कुलाल उपस्थित होते.




