बेळगाव लाईव्ह : वंटमुरी घाटात गाडी अडवून लूटमार करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात काकती पोलिसांना यश आले असून चौघांना अटक करून त्यांच्यावरील लुटण्याचे साहित्य दुचाकी आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
शिवाजी अशोक वंटमूरी, (वय 22, रा. होस वंटमूरी, ता. जि. बेळगाव),विशाल सुरेश मस्ती, (वय 21, रा. मल्लहोळ, ता. जि. बेळगाव),भीमराय बसप्पा करीकट्टी, (वय 19, रा. होस वंटमूरी, ता. जि. बेळगाव),मारुती भीमप्पा हंचिनमनी, (वय 32, रा. रामदुर्ग (उक्कड), ता. जि. बेळगाव)अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहितीनुसार गेल्या 19 जून 2025 रोजी रात्री फिर्यादी बीरप्पा रायप्पा कण्णूर (रा. अनंत विद्या नगर प्लॉट, सांकेश्वर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) हे वाहन क्र. केए-22/एए-6388 अशोक लेलँड बॉस गाडी घेऊन वंटमूरी गावच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावरील पूलाजवळ जात असताना काही आरोपींनी त्यांची गाडी अडवून थांबवली. त्यांना मारहाण करून डोक्यावर दगडाने हल्ला करत त्यांच्याकडील 1100 रुपये आणि 2 ओशो कंपनीचे मोबाइल फोन हिसकावून पळ काढला. याबाबत काकती पोलीस ठाण्यात प्रकरण क्र. 131/2025, कलम 311 बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता
या प्रकरणात गंगाधर, एसीपी, बेळगाव ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली काकती ठाण्याचे पी.आय. सुरेश पी. शिंगी यांच्या नेतृत्वाखालील पी.एस.आय. आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने दिनांकरोजी खालील आरोपींना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून लुटलेले 2 मोबाइल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेल्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.लुटारूंना अटक करून लुटलेली वस्तू जप्त करण्यात यशस्वी झालेल्या काकती ठाण्याचे पी.आय. आणि त्यांच्या पथकाच्या कार्याचे बेळगाव शहराचे मान्यवर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.


