बेळगाव लाईव्ह :कर्नाटकातील सध्याच्या काँग्रेस सरकारच्या राजवटीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा वापर करून सरकारी खात्यांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये खानापूर तालुक्यातील एका युवतीचा समावेश असून आम्ही यासंदर्भात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती खानापूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनईकर यांनी दिली.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनईकर यांनी सांगितले की, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जवळपास सहा महिन्यातच काही विविध सरकारी खात्यांमध्ये नोकर भरतीची टूम उठली. त्यानंतर काही सरकारी खात्यांमधील रिक्त पदे भरण्यासाठी काही लोकांशी संपर्क साधण्यात आला. त्याचप्रमाणे ज्यांनी संबंधित खात्याकडे किंवा एम्प्लॉयमेंट ब्युरोकडे नोकरीसाठी अर्ज केले होते. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यापैकी काव्य येळ्ळूर ही एक असून तिची फसवणूक झाली आहे.
या संदर्भात चौकशी केली असता अनेक जणांची या पद्धतीने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तथापि पुराव्याशिवाय कांही करता येत नसल्यामुळे मी गप्प होतो. त्याचवेळी गंदीगवाडमध्ये सरकारी नोकरी लावतो म्हणून काव्या येळ्ळूर हिच्याकडून मंजुनाथ बलसरगी नावाच्या एका माणसाने 4.5 लाख रुपये आणि तिच्या भावालाही नोकरी लावतो म्हणून आणखी 1 लाख रुपये असे एकूण 5.5 लाख रुपये घेतले. या पैशाच्या मोबदल्यात एप्रिल 2024 मध्ये काव्याला महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे लेटर पॅड असलेले त्यांच्या नावाचे एक पत्र पाठवलं.
त्या पत्रामध्ये अमुक ही कागदपत्रे हजर कर, तुला अमुक या खात्यामध्ये नोकरी देण्यात आली आहे असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर अल्पावधीतच बेळगाव तहसीलदार कार्यालयात ठिकाणी आत्महत्या केली आणि ती आत्महत्या नोकर भरतीशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी काव्याला फोन करून कळवण्यात आले की, तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येमुळे मंत्र्यांना मनस्ताप झाला असून तुला पाठवलेला नोकरी मिळाल्याचा पहिला आदेश रद्द करण्यात येऊन नव्याने आदेश पाठवण्यात येईल. स्वतःच्या व भावाच्या सरकारी नोकरीसाठी साडेपाच लाख रुपये दिले असल्यामुळे त्यानंतर मार्च -एप्रिल 2025 मध्ये नोकरीसाठी विचारणा सुरू केली. त्यावेळी पुन्हा तिला एक आदेश देण्यात आला.
दरम्यान या संदर्भात सुरू झालेली चर्चा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कानावर गेल्यानंतर मी स्वतःच्या संदर्भात तक्रार नोंदविली आहे सरकारी नोकरी संदर्भात माझ्या कोणत्याही माणसाच्या हातात पैसे देऊ नका, माझ्या खात्यावर पैसे भरू नका, असे त्यांनी घोषित केले. त्यानंतर कागदोपत्री पुराव्यासह काव्य येळ्ळूर हिला कित्तूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार तक्रार नोंदवून चार-पाच वेळा कागदपत्रांची पूर्तता करून देखील पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही. परिणामी आपले पैसे परत मिळवण्यासाठी काव्य हीने मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली.
या तक्रारीची एक प्रत बैलहोंगलच्या पोलीस उपजिल्हाप्रमुखांना मिळाली. त्यांनी त्या संदर्भात नोटीस बजावताच त्याच दिवशी कित्तूर पोलीस ठाण्यात विठ्ठल पडगमनावर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आणि काव्या येळ्ळूर लाहि पुन्हा कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले. कित्तूर पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्यामुळे मंजुनाथ आणि संगणगौडा पाटील ज्याची मंत्री हेब्बाळकर यांच्याशी अत्यंत जवळीक असल्याचे सांगितले जाते. या संगणकवडा पाटील यांनीच मंजुनाथ यांच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक केली आहे. ही बाब जेंव्हा स्पष्ट झाली त्यावेळी दबावाखाली असलेल्या कित्तूर पोलिसांनी फसवणूक झालेल्यांना “तुम्ही दिलेल्या पैशांपैकी 75 टक्के पैसे तुम्हाला मिळतील, 25 टक्के सोडून द्यावे लागतील.
हे मान्य आहे का पहा, अन्यथा आम्ही गुन्हा नोंदवून घेतला तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही,” अशा पद्धतीचा दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांच्या दबावामुळे काहींनी 25 टक्के पैशावर पाणी सोडून आपले पैसे परत घेतले. मात्र हे करताना कित्तूर पोलीस ठाण्यातील बॉण्डवर 25 टक्के पैसे रोख मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात फसवणूक झालेल्या संबंधित लोकांची नार्को चांचणी करण्यात आली असता ते 25 टक्के पैसे कित्तूर पोलीस व संबंधित इतरांनी हडप केल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे काव्या येळ्ळूर हिच्यावर प्रचंड दबाव आणण्याचा मात्र तिने आपण या फसवणुकी विरोधात तक्रार नोंदवणारच असे स्पष्ट केले. त्यामुळे आता आजच तिला पुन्हा नोटीसीद्वारे सात दिवसात कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे.
मात्र कित्तूर पोलिसांनी चालाखी करताना ही नोटीस देखील सात दिवसांच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी मिळेल या पद्धतीने पाठविली आहे. थोडक्यात कित्तूर पोलीस कोणाच्या तरी मोठ्या दबावाखाली हे प्रकरण कसेही करून दाबण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट होते असे सांगून कित्तूर आणि नंदगड पोलिसांचे हे षडयंत्र जेंव्हा आमच्या लक्षात आले, त्यावेळी आम्ही यापूर्वीच खानापूर न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनईकर यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस काव्या येळ्ळूर व हणमंत गुडलार उपस्थित होते


