बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने आज बुधवारी गणेश चतुर्थी दिवशी रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे शहरातील विविध मार्गांवर लक्षवेधी पथसंचलन (रूट मार्च) काढण्यात आले.
बेळगाव शहरांमध्ये यंदा सुमारे 378 सार्वजनिक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. श्री गणेशोत्सव काळात बेळगाव मधील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने गर्दी करत असतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहराच्या संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. त्याचबरोबर आज बुधवारी श्री गणेश चतुर्थी दिवशी सकाळी विविध भागांमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथसंचलन काढण्यात आले.

या रूट मार्चला अर्थात पथसंचलनाला शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून प्रारंभ होऊन चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, शास्त्री चौक, दरबार गल्ली, खडेबाजार, जालगार गल्ली, खडक गल्ली मार्गे मार्केट पोलीस ठाण्याच्या ठिकाणी सांगता झाली. पथसंंचालनातील पोलीस अधिकाऱ्यांसह डोक्यावर सफेद निळे शिरस्त्रान आणि निळ्या गणवेशातील हातात लाठ्या व शस्त्रं घेतलेले आरएएफ जवान साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
दरम्यान, बेळगाव शहरातील नागरिकांनी श्री गणेश चतुर्थीसह श्री गणेशोत्सव शांततेने आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत या पद्धतीने सौहार्दपूर्णरित्या साजरा करावा.



त्याचप्रमाणे सर्व नियमांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.


