बेळगाव लाईव्ह :दरवर्षी गणेशोत्सवात ‘बेळगावचा’ राजा’च्या आगमनाप्रसंगी त्याच्या स्वागतार्थ बेळगावच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर ग्रामीण भागातून गणेश भक्त मोठ्या संख्येने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात येत असतात.
त्यानुसार काल शुक्रवारी रात्री देखील धर्मवीर संभाजी महाराज चौकात गणेश भक्तांची अलोट गर्दी झाली होती आणि रात्री ठीक 11 वाजता चौकात 18 फूट उंचीच्या ‘बेळगावचा’ राजा’चे दिमाखात आगमन होताच त्याचे ढोल-ताशाच्या दणदणाटात जल्लोषी आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
बेळगावात काल शुक्रवारी रात्री संततधार पाऊस पडत होता. मात्र बेळगावच्या राजाचे आगमन होताच पाऊसही कांही काळ थांबला. त्यामुळे बेळगावच्या राजाची पहिली झलक गणेश भक्तांना पाहायला मिळताच मोठे उत्साही व जल्लोषी वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हा सीमाभागातील सर्वात पहिला सार्वजनिक गणपती आगमन सोहळा असतो.
बेळगावच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी हजारो बेळगावकर काल सायंकाळपासूनच धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकात जमले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुप्रसिद्ध बेळगावचा राजा गणपतीच्या पहिल्या लूकचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. त्यानंतर राजाचे पूजन पोलीस उपायुक्त नारायण भरमनी, माजी आमदार अनिल बेनके भाजप नेते मुरगेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते शोल्क राजू कडोलकर व रोहित रावळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार कार्याध्यक्ष सुनिल जाधव यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘बेळगावचा राजा’ श्री मूर्ती मूर्तिकार रवी लोहार यांनी बनवली आहे. ही मूर्ती प्रभावळीसह 21 फूट उंच आहे.
धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकात काल शुक्रवारी रात्री 9 वाजल्यानंतर गर्दीचा महापूर आला होता. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांकडून कांही कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद खावा लागला बेळगावचा राजाच्या आगमनाप्रसंगी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ढोल-ताशा पथक व इतर वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन साऊंड सिस्टीम असलेली वाहने मात्र मूर्तीजवळ पोहोचू दिली नाहीत.
या आगमन सोहळ्याप्रसंगी दरवर्षी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन यंदा देखील सायंकाळी 6 वाजल्यापासूनच धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपायुक्त नारायण भरमनी यांच्या नेतृत्वाखाली मार्केट व खडेबाजार पोलीस सहआयुक्त पोलीस निरीक्षक यांच्यासह 10 पोलिस अधिकारी आणि मोठ्या फौज फाटा बंदोबस्ताला होता तथापि रात्री उशिरापर्यंत आगमन सोहळ्यामध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळाला.



