बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलिसांनी शहरातील विविध भागांत केलेल्या कारवाईमध्ये दुचाकी चोर आणि गांजाचे सेवन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
मार्केट पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १.२० लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी रॉबर्ट चंद्रशेखर नागनूर (३२) यांनी त्यांच्या दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपी महम्मद उर्फ झिया सय्यद शेख (२५) याला अटक करत त्याच्याकडून होंडा ॲक्टिवा, बजाज पल्सर आणि एप्रिल स्टॉर्म स्कूटर अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
याचबरोबर, टिळकवाडी आणि मार्केट पोलिसांनी गांजाचे सेवन करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. आरोपी प्रफुल्ल गजानन पाटील (२६, रा. रघुनाथ पेठ) याला टिळकवाडी १ नंबर रेल्वे गेटजवळ अटक करण्यात आली. त्याच दिवशी मार्केट पोलिसांनी आरटीओ सर्कलजवळ एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतले.
त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रवीण उर्फ आकाश राजू मेत्री (२३, रा. चव्हाट गल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व कारवायांमध्ये एकूण सहा आरोपींना ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे.




