बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये शेतकरी संघटना आणि कर्नाटक युवा रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी जय किसान खासगी भाजी मार्केट बंद होऊ नये, अशी जोरदार मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी जय किसान खासगी भाजी मार्केट फायदेशीर ठरत असून, या मार्केटमुळे त्यांचा वाहतुकीचा खर्च कमी होतो आणि वेळेवर पैसे मिळणे शक्य होते.
तसेच वजन आणि मोजमापात कोणतीही फसवणूक होत नाही, असे शेतकऱ्यांनी नमूद केले. त्यामुळे हा खासगी भाजी मार्केट कायम राहावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जर जय किसान मार्केट बंद झाला तर त्यांना एपीएमसी मार्केटकडे जावे लागेल, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च दुप्पट होईल. शिवाय, एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडून ८ ते १५ टक्के कमिशन वसूल केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तुटवडा सहन करावा लागेल.


याचप्रमाणे, रविवारी पेठेतील लसूण मार्केटही जय किसानच्या खासगी भाजी मार्केटमध्ये स्थानांतरित करावा, अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली. खासगी भाजी मार्केटमधील शेतकऱ्यांवर फसवणुकीचे आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एकदा तपासणी करावी, अशी विनंती केली.
एपीएमसी शेतकऱ्यांपासून दूर असल्याने आणि योग्य भाव न मिळाल्याने, दोन्ही – खासगी तसेच एपीएमसी मार्केट कायम असावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या आंदोलनात शेतकरी संघटना आणि कर्नाटक युवा रक्षण वेदिकेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


