(बेळगावचे माजी महापौर गोविंदराव महादेव राऊत यांचे गेल्या २ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. आज त्यांचा अकरावा दिवस. त्यानिमित्त………..)
एखादी व्यक्ती जन्माला येताना ती कोणत्या कुळात जन्मली किंवा कोणत्या घरात जन्मली यावर मोठी होत नाही. एवढेच नव्हे तर ती किती शिकली यावरही मोठी होत नाही तर ती मोठी होते स्वतःच्या कर्तुत्वाने आणि चरित्र्याने. असाच आजवरचा अनुभव आहे . त्याला गोविंदराव राऊत हेही अपवाद नाहीत.
पिरणवाडी या शहरालगतच्या गावात त्यांचा जन्म दि.10 जानेवारी 1947 रोजी महादेवराव राऊत यांच्या पोटी झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे बालपण बरेच कष्टात गेले. दहावीपर्यंतचे शिक्षण पिरणवाडीत आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण आर पी डी महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एक चांगली नोकरी मिळवली की ज्यामुळे समाजातील अनेकांशी त्यांचा संबंध आला. जीवनात काहीतरी करून दाखवायचे ही जिद्द उराशी बाळगल्याने ते नोकरीत जास्त काळ टिकले नाहीत. त्यांनी स्वतःला समाजकारणात झोकून दिले. त्यांच उद्योगी मन त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातूनच त्यांनी 1976 साली विशाल आयर्न स्टील व विशाल उद्योग या नावे फाउंड्री व्यवसायाची सुरुवात केली. त्या काळात फाउंड्री उद्योगाला भरपूर काम मिळत नव्हते त्यामुळे गोविंदरावांनी पुणे, मुंबई, कोल्हापूर सारख्या शहरात जाऊन मोठ्या ऑर्डर्स मिळविल्या आणि आपला विशाल उद्योग समूह नावारूपास आणला. बेळगाव ही जशी कष्टकरी जनतेची भूमी आहे तशीच ती निष्णांत कारागिरांची म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच येथील उद्योजकांनी नाव व पैसा दोन्ही मिळवला .त्याला गोविंदराव राऊत हेही अपवाद नाहीत.
मात्र आपल्या उद्योग – व्यवसायातून मिळवलेल्या पैशाचा उपयोग त्यांनी उद्योग वाढविण्याबरोबरच समाजासाठीही केला. त्यांनी ज्योती महाविद्यालय व इतर अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत केली. हे करीत असतानाच त्यांनी स्वामी विवेकानंद कॉलनीत जागा घेऊन बंगला बांधला. तेथील जनतेच्या मदतीने ते 1986 – 87 साली महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या भागात श्री सिद्धिविनायक मंदिर उभारण्याबरोबरच ती टिळकवाडीत गजानन महादेव मंदिर व मारुती मंदिर उभारलेच आणि त्या भागाच्या विकासाच्या अनेक योजनाही राबविल्या.
उद्यमबागेत कामगार वर्गाला व लघुउद्योजकांना मदत व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन बेळगाव इंडस्ट्रियल को-ऑप. सोसायटीची स्थापना केली. ज्या सोसायटीमुळे अनेक लहान मोठे उद्योजक आणि कामगार वर्ग यांच्या विकासास मदत झाली.
हे करीत असतानाच टिळकवाडीत श्री शिवाजी वाचनालय सुरू करून त्यांनी वाचकांची भूक भागविली. साधारण 1990 च्या दरम्यान बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयात ते कार्यकारणीवर निवडून गेले. इसवी सन २००० साली सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगावात ७३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले त्यासाठी गोविंदराव राऊत व सहकार्यानी अहोरात्र मेहनत करून ते संमेलन यशस्वी केले. तेव्हापासून आजवर आठ वेळा सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या गोविंदराव राऊत यांनी 2000 साली प्रथमत:अध्यक्षपद भूषविले असून आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक योजना राबवून त्या यशस्वी करून दाखवल्या. खास करून आठ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली संगीत भजन स्पर्धा व वाचनालयाची अनगोळ शाखा सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
दोन वेळा नगरसेवक म्हणून आणि नंतर महापौर म्हणूनही त्यांनी आपली कारकीर्द गाजविली. अनेक महत्त्वकांक्षी योजना राबवून त्या यशस्वी करून दाखवल्या. सर्वप्रथम टिळकवाडीचा मास्टर प्लॅन राबविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
“सीमा लढ्यातील योगदान”
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिकिटावर नगरसेवकपदी आणि महापौरपदी निवडून आलेल्या राऊत यांनी सीमा लढ्यासाठी भरीव योगदान दिले. समितीच्या विविध आंदोलनासाठी लागणारी आर्थिक मदतही त्यांनी देऊ केली. बेळगावच मराठीपण त्यांनी नेहमीच जपलं. ते ज्या पिरनवाडीत जन्मले, वाढले ,शिकले त्या पिरणवाडीतील प्राथमिक शाळा आणि कर्मवीर विद्यामंदिर या माध्यमिक शाळेला त्यांनी नेहमी सहकार्य केले. कर्मवीर विद्या मंदिरासाठी एक सभागृह बांधून दिले. त्याचबरोबर पिरणवाडीतील राम मंदिरात जिम्नेशियम हॉल ही बांधून दिला.
आपल्या सामाजिक जीवनात त्यांना अनेक कर्तृत्ववान माणसे भेटली त्यांच्या सानिध्यात त्यांनी स्वतःच्या जीवनाचे सोनं केलं. त्यांचा मित्र परिवार अफाट होता.एका सामान्य कुटुंबातून आलेल्या राऊत यांनी असामान्य कार्य केलं असंच म्हणावं लागेल. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि बेळगाव कोल अँड कोक या संस्थेतही ते कार्यरत होते.
अशाप्रकारे जिद्दीन, धाडसाने काम करणाऱ्या गोविंदरावाना तब्येतीचा त्रास सहन करावा लागला. पण त्यावरही मात करून त्यांनी जिद्दीने वाटचाल चालूच ठेवली.
आपल्या व्यवसायात, कौटुंबिक जीवनात त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागले. पण त्यातूनही ते सावरले होते पण नियतीला हे मान्य नव्हते. अगदीच चार दिवसांच्या अल्पशा आजाराने त्यांना काळाच्या पडद्याआड नेलं आणि कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. असे हे गोविंदराव राऊत अनंतात विलीन झाले असले तरीही त्यांची स्मृती त्यांच्या कार्याच्या रुपाने कायम राहणार आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना!



