बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नवीन कंत्राटदार शोधण्याचे प्रयत्न बंद केली असून निविदा प्रक्रिया सलग तिसऱ्यांदा अपयशी ठरली आहे. ऑगस्टमध्ये तयार झालेल्या शेवटच्या निविदा तीन वेळा प्रसिद्ध झाल्यानंतरही, कोणतीही एजन्सी काम हाती घेण्यासाठी पुढे आलेली नाही, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हंटले आहे.
आता नव्याने निविदा न आल्यामुळे सध्याच्या कंत्राटदारालाच निर्बीजीकरण मोहीम पुढे सुरू ठेवावी लागणार आहे. महापालिका चौथ्यांदा निविदा मागवेल की नाही हे अनिश्चित असले तरी येत्या कांही दिवसांत आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. भटक्या कुत्र्यांचा धोका हा बेळगावमध्ये एक गंभीर मुद्दा बनला आहे.
शहरात जून 2022 पासून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या श्रीनगरमधील गोशाळेत निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जातात. तथापी मर्यादित सुविधांमुळे दररोज फक्त 8-10 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करता येते. पूर्वी आठवड्यातून फक्त दोनदा या शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. आता त्या आठवड्यातून सहा दिवस केल्या जात असल्या तरी शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही क्षमता कमी पडते.
विद्यमान कंत्राटदारासोबतच्या गुंतागुंतीमुळे भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामाची गतीही मंदावली आहे. प्रलंबित देयकांमुळे कांही महिने काम थांबले होते आणि बिले मंजूर झाल्यानंतर ते पुन्हा सुरू झाले असले तरी कंत्राटदार काम वाढवू शकलेला नाही. कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कामाची क्षमता वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरेबागेवाडी येथील 2 एकर जागेमध्ये निर्बीजीकरण केंद्र उभारण्यास मान्यता दिली आहे.
ध्वनीरोधक आणि आधुनिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेली ही सुविधा तयार झाल्यास जवळपासच्या ग्रामस्थांना त्रास न होता दररोज 100 हून अधिक कुत्र्यांना हाताळता येणार आहे. विद्यमान कंत्राटदाराचा कार्यकाळ अधिकृतपणे जून 2023 मध्ये संपला, परंतु कोणताही बदलीकर्ता उपलब्ध नसल्यामुळे, दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे जोपर्यंत नवीन कंत्राटदार सापडत नाही आणि हिरेबागेवाडी केंद्र कार्यान्वित होत नाही तोपर्यंत सध्याच्या व्यवस्थेनुसार निर्बीजीकरणाचे काम सुरू राहणार आहे.



