बेळगाव लाईव्ह विशेष : सण-उत्सवांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजातील संगीताचा वापर वाढला आहे, पण हाच जल्लोष अनेकांसाठी दुर्दैवी ठरत आहे. अलीकडच्या काळात अशा मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे कर्णकर्कश आवाजाच्या धोक्यांबाबत तातडीने जनजागृती करणे आणि प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांत डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका, भिंत कोसळून मृत्यू, किंवा दोन गटांमध्ये वाद होऊन खुनाच्या घटना देशभरात घडल्या आहेत. कर्नाटकच्या कोप्पळमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. अशीच घटना ओडिशाच्या राऊरकेला आणि महाराष्ट्रातील सांगलीमध्येही घडली, जिथे गणेश विसर्जनादरम्यान दोन तरुणांचा जीव गेला.
भोपाळमध्ये तर डीजेच्या कंपनामुळे एक जुनी भिंत कोसळून नऊ निष्पाप मुलांचा बळी गेला, तर एका १३ वर्षांच्या मुलाचा नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नाशिकमध्ये डीजेच्या आवाजामुळे नाकातोंडातून रक्तस्राव झाल्याची घटनाही समोर आली. डीजेचा अति आवाज मानवी शरीरासाठी किती घातक ठरू शकतो हे या घटनांवरून लक्षात येते. ध्वनी प्रदूषण केवळ ऐकण्याच्या क्षमतेलाच नाही, तर संपूर्ण आरोग्याला धोका निर्माण करते. यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयाची धडधड अनियमित होते आणि ताणतणाव वाढतो. म्हणूनच, सण-उत्सव साजरे करताना आवाजाची पातळी नियंत्रित ठेवणं महत्त्वाचं आहे.

बेळगावमधील मिरवणूक मार्गावरील प्रमुख रुग्णालयांमध्ये सुभाष नगर येथील नोमानी हॉस्पिटल, सदाशिव नगर येथील भूमी वूमेन्स केअर हॉस्पिटल आणि उप्पिन मल्टी स्पेशालिटी, अनगोळ येथील डॉ. तेजनन्नावर चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, रामतीर्थ नगर येथील उदोशी हॉस्पिटल, तसेच खडक गल्ली, महादेव नगर, शिवबसव नगर आणि रुकमिनी नगर परिसरातील जय अंबे जनरल हॉस्पिटल, श्री साई हॉस्पिटल, विभा हॉस्पिटल, श्री नंदी क्लीनिक, सुकृती क्लीनिक आणि सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा समावेश आहे. याशिवाय, आझम नगर, रेणुका नगर, वीरभद्र नगर, कामत गल्ली, शहापूर, श्री नगर, नेहरूनगर, अयोध्यानगर, मारुती नगर, नित्यनांद सर्कल, महांतेश नगर, शिवाजी नगर, कोल्हापूर सर्कल आणि शेट्टी गल्ली अशा विविध भागांमध्ये अल हयात हॉस्पिटल, यशश्वी हॉस्पिटल, न्यू लाईफ हॉस्पिटल, आशीर्वाद हॉस्पिटल, वात्सल्य हॉस्पिटल, अंकुर हॉस्पिटल, केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल, विजया ऑर्थो अँड ट्रामा सेंटर हॉस्पिटल, अभिनंदन हेल्थ केअर हॉस्पिटल, लेक व्ह्यू हॉस्पिटल, मेटगुड हॉस्पिटल, धुमाळे हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, अरिहंत हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, आणि व्ही-केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांसारखी अनेक रुग्णालये आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मिरवणुकांमध्ये आवाजाची पातळी जास्त असल्याने रुग्णांना, विशेषतः हृदयविकार आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मोठा त्रास होऊ शकतो. एसपीएम रोड, महादेव रोड, काकतीवेस रोड, शनिवार खूट येथील अपूर्व हॉस्पिटल, यश हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, श्री ईएनटी हॉस्पिटल, श्रावगे हॉस्पिटल, गुरुनानक डेंटल हॉस्पिटल, नवजीवन हॉस्पिटल, थ्री एम डेंटल हॉस्पिटल, अरविंद तेंनगी आय हॉस्पिटल आणि अल हयात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच मारुती गल्ली, रामदेव गल्ली, गोंधळी गल्ली, बोगारवेस, टिळक चौक, तहसील दार गल्ली, किर्लोस्कर रोड, कॅम्प, एम.एफ. रोड, गोआवेस सर्कल, अगरकर रोड, शास्त्री नगर या परिसरातील अनिल कुलकर्णी चाइल्ड हॉस्पिटल, गोखले आणि सुतार ईएनटी हॉस्पिटल, महावीर लठ्ठे डर्मोलॉजिस्ट हॉस्पिटल, नातू संजीवनी, छत्रे हॉस्पिटल, सुलोचना आय हॉस्पिटल, सिटी पॉलिक्लिनिक, डॉ. प्रभू हलकट्टी हॉस्पिटल, देशपांडे चाइल्ड हॉस्पिटल, शिवबसव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्रभू नर्सिंग होम, अश्विनी हॉस्पिटल, डॉ. बाळोजी आय हॉस्पिटल, गिज़रे हॉस्पिटल, अनुषा डेंटल केअर, पाटील क्लिनिक, बेळगाव चिल्ड्रेन हॉस्पिटल, नोबेल केअर हॉस्पिटल, रेम्बो चिल्ड्रेन हॉस्पिटल, चिरायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सेंट्रा केअर हॉस्पिटल, वेणुग्राम हॉस्पिटल, दक्षता हॉस्पिटल, डेक्कन हॉस्पिटल, आणि समीर बागेवाडी आय हॉस्पिटल या सर्वांना मोठ्या आवाजाचा सामना करावा लागतो.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांमध्ये मिरवणुका निघतात, तेव्हा जल्लोषाच्या वातावरणात अनेकदा एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित होतो – तो म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि त्याचा रुग्णालयांवर होणारा परिणाम. बेळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर अनेक रुग्णालये आहेत, त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या आनंदासोबतच इतरांच्या आरोग्याचा विचार करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. या सणासुदीच्या काळात आपण सर्वांनी मिळून ही सामाजिक जबाबदारी स्वीकारूया आणि मर्यादित आवाजातच उत्सव साजरा करूया, आणि आपल्यासोबतच समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आनंद आणि आरोग्य सुरक्षित राहील याचीही काळजी घेऊया..
माहिती साभार : पोलिस आयुक्त प्रेस रिलीज


