बेळगाव लाईव्ह :केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या चालू पुनर्विकासाविषयी आणि चेन्नई व कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमध्ये नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या शक्यतांबद्दल माहिती दिली. राज्यसभेतील खासदार इराण्णा कडाडी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
बेळगाव रेल्वे स्थानक पुनर्विकास : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत बेळगाव स्थानकावर अनेक सुधारणा अर्थात विकास कामे सुरू आहेत. ज्यामध्ये कोच इंडिकेशन बोर्ड, ट्रेन इंडिकेशन बोर्ड, सार्वजनिक घोषणा प्रणाली आणि घड्याळे बसवणे समाविष्ट असून जे आता पूर्ण झाले आहे.
चालू कामांमध्ये 12 मीटर फूट ओव्हरब्रिजचे बांधकाम,
लिफ्ट आणि एस्केलेटर उभारणे, प्लॅटफॉर्म निवारा सुधारणा, पार्किंग आणि फिरत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा हे समाविष्ट आहे.
अमृत भारत स्टेशन योजना मास्टर प्लॅन दृष्टिकोनासह रेल्वे स्थानकांच्या दीर्घकालीन आणि टप्प्याटप्प्याने विकासावर लक्ष केंद्रित करते. तिच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये चांगली प्रवेशयोग्यता आणि फिरणारी क्षेत्रे,
सुधारित प्रतीक्षालय, शौचालये, लिफ्ट/एस्केलेटर, प्लॅटफॉर्म सर्फेसिंग आणि निवारा स्वच्छता, मोफत वाय-फाय आणि प्रवासी माहिती प्रणाली, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ अंतर्गत स्थानिक उत्पादनांसाठी कियोस्क, कार्यकारी लाउंज, व्यवसाय बैठक क्षेत्रे आणि लँडस्केपिंग, दिव्यांगजनांसाठी मल्टीमॉडल एकत्रीकरण आणि पायाभूत सुविधा, शाश्वत उपाय आणि स्थानकावर शहर-केंद्र निर्मितीची क्षमता यांचा समावेश आहे. सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत बेळगावसह 1,337 स्थानकं ओळखली जात असून त्यांची कामे चांगल्या गतीने सुरू आहेत.
बेळगावहून रेल्वे सेवा : सध्या, बेळगाव रेल्वे स्थानकावरून 50 मेल/एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावतात. ज्यामध्ये 18 सप्टेंबर 2024 रोजी बेळगाव मार्गे सुरू झालेल्या हुबळी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस (20669/20670) रेल्वेचा समावेश आहे. या गाड्या बेळगाव शहराला मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद व म्हैसूर यासारख्या प्रमुख शहरांशी जोडतात.
चेन्नई आणि कोलकाता सारख्या शहरांना नवीन रेल्वे सेवांबाबत केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या संपर्क (कनेक्टिव्हिटी) गरजांचे प्रामुख्याने वाहतूक मागणी, कार्यरत व्यवहार्यता, संसाधनांची उपलब्धता, स्पर्धात्मक प्राधान्यक्रम याच्या आधारे सतत मूल्यांकन करते. चेन्नई किंवा कोलकाताला नवीन रेल्वे गाड्यांची तात्काळ घोषणा नसली तरी, भारतीय रेल्वे खात्री देते की विस्तार आणि सेवा सुधारणा ही चालू प्रक्रियेचा भाग आहेत.


