बेळगाव लाईव्ह :अनगोळ, बेळगाव येथील अंडरपास रस्त्याचे (अंडरब्रिज) काम सुरू असलेल्या चौथ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना किमान 7 मीटरचा सर्व्हिस रोड उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक जनतेच्यावतीने माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौरांकडे केली आहे.
अनगोळ चौथ्या रेल्वे गेट परिसरातील जनतेच्यावतीने माजी नगरसेवक विनायक गोपाळ गुंजटकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी महापौर मंगेश पवार यांना सादर केले.
महापौरांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अनगोळ चौथ्या रेल्वे गेट परिसरात हा निवासी क्षेत्र आहे आणि दोन्ही बाजूंना छोटे विक्रेते विविध व्यवसाय करून त्यांची रोजची रोजीरोटी कमवत आहेत.

सध्याच्या तरतुदीनुसार येथील अंडरपास रस्त्याचा सर्व्हिस रोड खूपच अरुंद असल्याने वाहनांचा मोकळेपणाने संचार अशक्य आहे. अरुंद रस्त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत चारचाकी वाहने गंतव्यस्थानावर पोहोचू शकत नाहीत. महानगरपालिकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार (बुडा) 200 मीटर लांबीचा रस्ता आणि दोन्ही बाजूंना 7.5 मीटरचा सर्व्हिस रोड उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
तथापि चौथ्या रेल्वे गेट येथील रेल्वे अंडरब्रिजचा आराखडा महानगरपालिकेच्या इमारत रस्त्याच्या उपनियमांच्या विरुद्ध आहे. सर्व्हिस रोड बांधण्यासाठी रेल्वे मार्गदर्शक तत्वे असली तरी महानगरपालिकेची काही मार्गदर्शक तत्वे आहेत की नाहीत? हा अंडरपास रस्ता निवासी क्षेत्रात असलेल्या कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेला नाही.
म्हणूनच मुख्य रस्त्याची रुंदी कमी करावी आणि 7.5 मीटरचा सर्व्हिस रोड बांधण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी, ही विनंती आहे. पावसाळ्यात जर पाण्याचा निचरा न होता ते रस्त्यावर साचून राहिले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? यासाठीच आपण स्वतः जातीने जागेची पाहणी करावी, स्थानिक जनतेशी सल्लामसलत करावी, त्यांच्या समस्यांवर चर्चा करावी आणि अंडरपाससाठी आवश्यक मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत आणि ती मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवावीत, ज्यामुळे जनतेला मोठा फायदा होईल, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौरांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.


