बेळगाव लाईव्ह :यंदाही डीजेवर बंदी असणार आहे. त्यामुळे डीजे लावायचा असेल तर संबंधितांनी तो स्वतःच्या जबाबदारीवर लावावा. डीजेमुळे जर कोणाचा प्राण गेला, नुकसान झाले तर संबंधितांना जबाबदार धरले जाईल. तसेच उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी नशाबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देऊन यंदाचा गणेशोत्सव आणि श्री विसर्जन मिरवणूक सुरक्षितरित्या शांततेने सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कार्यरत राहील, अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.
शहरातील कुमार गंधर्व रंग मंदिर येथे आज जिल्हा प्रशासन व पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ तसेच श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी व सदस्यांच्या श्री गणेशोत्स पूर्वतयारीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागले असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक ठिकाणी डीजेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे उत्सव काळात कोणाच्या जीवावर बेतू नये यासाठी डीजेवर बंदी असणार आहे. डीजेमुळे जर कोणाचा प्राण गेला, नुकसान झाले तर आयोजकासह डीजे मालक आणि डीजे ऑपरेटर यांना जबाबदार धरले जाईल. त्यामुळे डीजे लावायचा असेल तर संबंधितांनी तो स्वतःच्या जबाबदारीवर लावावा. इतरांना त्यामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. बेळगावातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर अनेक हॉस्पिटल्स आहेत.
या हॉस्पिटल्समध्ये हृदयविकाराचे रुग्ण, लहान मुले, वयोवृद्ध वगैरे सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार घेत असतात. आपल्या उत्साह, आनंदाचा त्रास त्यांना होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. मिरवणूक शांततेने सुरळीत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात जाणार आहे. यंदाचा गणेशोत्सव आणि श्री विसर्जन मिरवणूक सुरक्षितरित्या शांततेने सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कार्यरत राहील.
ते पुढे म्हणाले की, श्री गणेशोत्सव काळात विशेष करून मिरवणुकीप्रसंगी नशाबाजी व अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी अल्को ब्रेथ अनालायझर, नार्कोटिक्स चेकिंग किट आणि हॅन्ड हेल्ड मेटल डिटेक्टर या गोष्टी आम्ही आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे देणार आहोत. या गोष्टींच्या सहाय्याने जे कोण मद्यपान करून अथवा गांजा पिऊन हिंडत असतील त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल. सध्या पोलीस आयुक्तालय व्याप्तीमध्ये आमचे अँटी स्टॅबिंग स्काड कार्यरत आहे.
त्यांच्याद्वारे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने मिरवणूक काळात स्वतः सोबत शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणतीही गय न करता संबंधितांचा रावडी शीटमध्ये समावेश केला जाईल अशी माहिती देऊन श्री गणेशोत्सव काळात कोणतीही अहितकारक घटना घडू नये यासाठी सध्या रावडी शीटर्स आणि जातीय गुन्हे केलेल्यांवर बंधने घातली जात आहेत, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शेवटी स्पष्ट केले.


