बेळगाव लाईव्ह :या ना त्या कारणास्तव सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या बेळगावचे सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटलमध्ये आता आणखी एक धक्कादायक गलथान प्रकार घडला आहे. बिम्सच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे पोटदुखीने त्रस्त युवकाच्या पोटातील गाठ काढण्याऐवजी त्याचे आतडेच कापल्यामुळे वैद्यकीय शास्त्रातील एक गंभीर चूक समोर आली आहे.
बिम्सच्या डॉक्टरांच्या गलथानपणाचा बळी ठरलेल्या रुग्णाचे नांव महेश मादार असे आहे. सदर युवकाला गेल्या 20 जून रोजी पोटदुखीमुळे बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तपासणी दरम्यान त्याच्या पोटात गाठ असल्याचे आढळून आल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
तथापी शस्त्रक्रिये दरम्यान त्याच्या पोटातील गाठ काढण्याऐवजी त्यांनी त्याच्या आतड्याचा कांही भाग कापून बाहेर काढला आणि टाके घातले. शस्त्रक्रियेनंतर घरी परतलेल्या महेश याला अधिक तीव्र पोटदुखी होऊ लागली.
त्यामुळे यावेळी त्याला केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी (स्कॅन) दरम्यान त्याचे आतडे कापले गेले असल्याचे निदर्शनास आले. सध्या महेश मादार याच्यावर केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या सर्व प्रकारामुळे रुग्णाला तसेच त्याच्या कुटुंबीयांना तीव्र मनस्ताप सोसावा लागला आहे. त्यामुळे बिम्सच्या डॉक्टरांच्या गलथान जीवघेण्या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.





